(चिपळूण)
लोटे औद्योगिक वसाहतीतील श्रीसंत ज्ञानेश्वर जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळेत शेती मीटरने जोडणी असतानाही व्यावसायिक दराने वीज आकारणी केली जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांचे बिल तब्बल २ लाखांहून अधिक आले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही जाणीवपूर्वक हे कृत्य केले जात आहे. पूर्वीप्रमाणे शेती मीटरनुसार आकारणी न केल्यास गोशाळेतील गाई महावितरणच्या कार्यालयात सोडण्याचा इशारा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे कोकण प्रांत अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला.
लोटे येथील गोशाळा भूखंडावरून आधीच वादग्रस्त बनली असताना महावितरणनेही या गोशाळेला बिलाचा ‘शॉक’ दिला आहे. याबाबत कोकरे महाराज यांनी सांगितले की, श्रीसंत ज्ञानेश्वर जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळेसाठी शेती मीटरची जोडणी आहे. या मीटरच्या युनिटनुसार आतापर्यंतची वीज बिले नियमितपणे भरली जात होती. मात्र, गेले दोन महिने व्यावसायिक वीज मीटरप्रमाणे गोशाळेला वीज बिलाची आकारणी केली जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांचे बिल २ लाख १० हजार इतके आले आहे. या बिलासाठी महावितरणने नोटीस बजावली असून, बिल न भरल्यास पोलिस बंदोबस्तात जोडणी तोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. याविषयी महावितरणकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चुकीची बिल आकारणी होत असल्याचे कळवूनही महावितरणचे अधिकारी जाणीवपूर्वक गोशाळेला त्रास देत आहेत. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.
गोशाळेत कोणताही व्यापार चालत नाही. खरेदी-विक्री केली जात नाही. गोपालन करणे हा एकमेव उद्देश आहे. परंतु, शासनमान्य असलेल्या या गोशाळेला व्यावसायिक स्वरूप आणला जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. गतवर्षी दोन महिने वीजपुरवठा बंद ठेवल्याने गोशाळेतील गाईंचे पाण्याविना हाल झाले. टँकरने पाणी उपलब्ध करावे लागले होते. मात्र, यावेळी गोशाळेचा वीजपुरवठा खंडित केल्यास महावितरण कार्यालयात सर्व गाई सोडल्या जातील, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार संजय पातपोर उपस्थित होते.