( वॉशिंग्टन )
गोपनीय कागदपत्रे बाळगल्याच्या आरोपांना सामोरे जाण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मियामीच्या फेडरल न्यायालयात हजर झाले होते. यावेळी त्यांनी आत्मसमर्पण केले. तसेच ट्रम्प यांनी आपल्याला दोषी ठरवू नये, अशी विनंतीही न्यायालयाला केली. दरम्यान, त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर या प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत.
याआधी ९ जून रोजी गोपनीय माहिती प्रकरणात ट्रम्प यांच्यावरील फेडरल आरोप सार्वजनिक करण्यात आले होते. त्याच्यावर गोपनीय माहिती बाळगणे, न्यायात अडथळा आणणे आणि खोटी वक्तव्य करणे असे तब्बल ३७ गुन्हे दाखल आहेत. ट्रम्प यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हास्यास्पद आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, फेडरल न्याय विभागाने सांगितल्यानुसार, “ट्रम्प यांनी संवेदनशील माहितीच्या फाईल त्यांच्या फ्लोरिडामधील त्यांच्या मार-ए-लीगो निवासस्थान आणि क्लबमध्ये कागदपत्रे ठेवली होती. या ठिकाणी नियमितपणे हजारो पाहुण्यांसोबत मोठ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ट्रम्प यांची ही कृती अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणू शकतो. याप्रकरणी ट्रम्प यांनी २० वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.” इतके होऊनही २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून ट्रम्प आघाडीवर आहेत.