(मुंबई)
राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित जाहिरातींमध्ये क्यूआर कोड टाकणं बंधनकारक करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. येत्या एक ऑगस्टपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यातील अनेक विकसकांना गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक आणि ठळकपणे दिसणारा क्यूआर कोड टाकावा लागणार आहे. याबाबत महारेराने एक परिपत्रक जारी केलं असून त्यात याबाबतच्या स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय महारेराने नव्या आणि जून्या नोंदणीकृत प्रकल्पांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिले आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यांपासून महारेराच्या या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आपल्या सदनिकेमधील फ्लॅटची विक्री त्वरित होण्यासाठी अनेक बिल्डर वर्तमानपत्रं, इलेक्ट्रॉनिक माध्यमं, न्यूज बेवसाईट्स तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती देत असतात. लोकांनी प्रकल्पात गुंतवणूक करावी, हा यामागचा हेतू असतो. परंतु आता विकसकांना जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक आणि क्यूआर कोडचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मार्च अखेरपर्यंतच्या नोंदणी झालेल्या प्रकल्पांचा तपशील सोबत क्यूआर कोडही देण्यात महारेराने सुरुवात केली आहे.
महारेराच्या या निर्णयामुळे नवीन घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कारण एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती लोकांना उपलब्ध होईल. प्रकल्पाच्या विकसकाचे नाव, प्रकल्पाची नोंद, तक्रारी, मंजुरी आणि आराखड्याची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार असल्यामुळं घरखरेदी करण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय विकासकांना दर सहा महिन्यांत प्रपत्र ५ वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं याचा मोठा फायदा घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.