(खेड / भरत निकम)
आमदार भास्करशेठ जाधव यांच्या मतदारसंघात त्यांना चारीमुंड्या चितपट करण्याच्या उद्देशाने शासनाकडून कोट्यावधींच्या विकासकामांची मंजूरी खांद्यावर घेऊन शिंदेगटाकडून पालकमंत्री उदय सामंत व नेते रामदास कदम या दोघांनी चांगली कंबर कसली आहे. संघटना वाढीकरिता दोघांचेही जोरदार प्रयत्न गुहागरमध्ये सुरु झाले आहे. अनेकांना हाताशी धरुन ठेवण्याचा प्रयत्न येथील राजकीय मैदानात सुरु आहे.
शिवसेना उबाठागटाचे नेते व गुहागरचे आमदार भास्करशेठ हे उत्कृष्ट संभाषण करुन संसदीय कामकाजात ‘उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार’ प्राप्त झालेले आहेत. कल्पकतेने ते विधानसभेत सरकारमध्ये असताना सरकारच्यावतीने तर विरोधात बसल्यावर सरकारच्या विरोधी ठोस भूमिका सातत्याने व योग्यतेने बजावतात. विरोधक म्हणून ते सरकारमधील मंत्री व अधिकाऱ्यांना धारेवर धरत मांडलेल्या प्रश्नांबाबत अक्षरशः जेरीस आणतात. ते चिपळूणचे सुरुवातीला आमदार बनले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून थेट विधानपरिषदेत प्रवेश केला होता. तिथे सक्रिय असताना गुहागर मतदारसंघ बांधून घेत तिथून विजय खेचून आणला.
एकीकडे भाजपकडे अनेक वर्षांपासून असलेला हा मतदारसंघ तत्कालीन विद्यमान आमदार डाॅ. विनय नातू तसेच राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते रामदास कदम या दोघांनाही पराभवाची धूळ चारली होती, अशी शेठ यांची ओळख आहे. अनेक आमदार गुहाटीला जाऊन फुटले तेव्हा मातोश्रीजवळ एकनिष्ठ ते होते. बोलण्यात त्यांची सरशी कुणी करु पाहत नाही. ते विरोधकांची मिमिक्री करण्यात खूपचं माहिर असून कधीही कुणाचीही विकेट पाडतात. यामध्ये शेठ यांचा फार वर्षांपासूनचा हातखंडा आहे. स्वच्छ प्रतिमा असल्याने त्यांच्यामागे एजन्सीज लावण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून प्रयत्न झाला. मात्र तो असफल झाला.
मातोश्रीच्या आदेशानुसार चालतात म्हणून सरकारने त्यांच्या मतदार संघात विकासनिधी देण्यास हात आखडता घेतलाय. या मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न शेठचे कट्टर विरोधक घेत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सामंत हे राष्ट्रवादीत असल्यापासूनचे विरोधक आहेत. तसेच रामदास कदम हे गुहागरमधील निवडणूकीनंतरच्या पराभवापासून शेठचे विरोध आहेत. हे दोघेही एकाच स्वरात स्वर मिळवून ‘दुध का दुध आणि पानी का पानी’ करण्याच्या उद्देशाने या गुहागर मतदार संघांच्या अग्णीकुंडात उडी घेऊन झेपावताहेत. सक्रिय राजकारणात ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल’ अशी शेरेबाजी सुरु ठेवून गुहागर मतदारसंघावर नजर रोखून रस्ते, स्मशानभूमी, पायवाट आणि इतर कामांसाठी कोट्यावधींचा निधी आणलेला आहे. रामदास कदमांच्या पत्रांवर पालकमंत्री शिफारशी देवून शासकिय निधीचे वितरण सध्या जोरात सुरु आहे.
गुहागर मतदारसंघातून अनेक पदाधिकारी विकास कामांसाठी थेट शिंदेगटाचा भगवा खांद्यावर घेताहेत. विकासाकरिता अजिबात निधी कमी पडू देणार नाही, असे अभिवचन रामदास कदम मतदारसंघातील जनतेला देत आहेत. तर दुसरीकडे मरगळलेल्या जून्यांना सक्रिय राजकारणात आणून त्यांच्या इच्छेनुसार अपेक्षांची पूर्तता केली जात आहे. एकुणच मातोश्रीचे एकनिष्ठ शेठना आगामी काळातील निवडणुकीत आस्मानी संकटात टाकायची तयारी शिंदे गटाकडून सुरु केली आहे. शेठ या संकटाचा सामना परतवून लावतात की, संकटात सापडतात, हे पहाणे पुढच्या काळात औसूक्याचे ठरणार आहे.