(गुहागर / प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
जंगलतोडीमुळे सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. त्याचप्रमाणे बिबट्या वाघाचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले देखील वाढत आहेत. गुहागर तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे राजाराम भाग्या जोगळे यांनी नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी जंगलात सोडली होती. मात्र नेहमीप्रमाणे दुपारी गुरे आणण्यासाठी ते जंगलात गेले असता त्यातील ६ गुरे घरी परत आली. तर ३ गुरे घरी न आल्याने श्री. जोगळे यांनी त्यांचा शोध घेतला असता दोन पाडे नजीकच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसून आले. तर १ पाडा जिवंत जंगलामध्ये आढळून आला.
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाड्यांमध्ये एक १८ महिन्याचा तर एक १० महिन्याचा पाडा असल्याचे शेतकरी राजाराम जोगळे यांनी सांगितले. एकीकडे अवकाळी पाऊस, लम्पिसारखे आजार असताना जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात अशाप्रकारे पाळीव जनावरांवर हल्ले होऊन ती मृत्यूमुखी होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वनविभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.