(रायगड / चंद्रकांत कोकणे)
राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व इतर सुगंधी तंबाखू, पान मसाला यांची टेम्पोमधून विक्री करणार्या एका इसमास गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने पनवेल शहर परिसरातून अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी १४ लाख ४२ हजार रुपये किमतीचा गुटखा व इतर सुगंधी तंबाखू यांच्यासह टेम्पो असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
पनवेल शहरातील साईनगर परिसरातील वाली सोसायटीसमोर शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व इतर सुगंधी तंबाखू, पान मसाला असा नशाकाराक पदार्थांची विक्री करण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाच्या पथकाला गुप्त मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वपोनि माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संजय रेड्डी आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी हरीश्चंद्र दास (२८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी १४ लाख ४२ हजार रुपये किमतीचा गुटखा व इतर सुगंधी तंबाखू यांच्यासह टेम्पो असा एकूण २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने सदर मालाचा साठा मुसफ उर्फ मुशरफ याला विक्री करीता देण्यासाठी आणल्याचे सांगितले. आरोपी बाबा (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) आणि मुसफ उर्फ मुशरफ (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) या त्याच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.