(जाकादेवी/ संतोष पवार)
गुजरात अक्षरमहोल तिथलं, वलसाड येथे रविवार दि.२९ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कवी संमेलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचे सुपुत्र प्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या पांडुरंग गोविंद महाडीक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव यांची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून मनोज जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदर राष्ट्रीय कविसंमेलन अक्षरमहोल हाँल, स्वामीनारायण मंदीर मिथल वलसाड गुजरात येथे संपन्न होणार असून अनेक दिग्गज कवी, साहित्यिक या कवी संमेलनात सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय संमेलनासाठी एक प्रतिभावंत कवी,लेखक आणि साहित्यिक म्हणून मनोज जाधव यांच्या निवडीचे जिल्ह्यातील साहित्यिक मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. मनोज जाधव यांचे साहित्य क्षेत्रातील काम जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत.
श्री.जाधव यांच्या आजपर्यंत ३५० हुन अधिक, कविता वर्तमान पत्र, दिवाळी अंक, मासिकांतून प्रकाशित झालेले आहेत. विविध विषयांवर १४ तीन अंकी नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे.
हा दोष कुणाचा.? सारं काही तुझ्यासाठी ? तर जपते मी सौभाग्याला..! ही नाटक प्रक्षेकांच्या भेटीला लवकरच येत आहेत. ६ एकांकिकांचे लेखन केले आहे. माणूस नावाची एक जात हा वैचारिक लेख संग्रह प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. मनोज जाधव हे गेली १८ वर्षे शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्याबरोबर सामाजिक साहित्यिक , सांस्कृतिक, धार्मिक ,कला, क्रीडा, जल, पर्यावरण व वृत्तसंकलन क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
अशा उल्लेखनीय कार्याबद्दल विविध सामाजिक संस्थेचे ३० राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत तर एक राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर जि.रत्नागिरी या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक-अध्यक्ष म्हणून गेली १७ वर्षे ते उत्तम प्रकारे काम करत आहेत.
साहित्यिक संस्थेचा संस्थापक म्हणून काम करताना महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्यिकांना एकत्र करून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शाखा निर्माण करून साहित्यिकांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण काव्यउपक्रम, तर विविध काव्यलेखन स्पर्धा, शोध साहित्यिकांचा तसेच विविध कविसंमेलनाचे सातत्याने आयोजन करण्यात कवी मनोज जाधव यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.
जलसा मंडळाच्या प्रबोधनकार चळवळीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी मनोज जाधव यांचा पुढाकार आजच्या पिढीला प्रेरक ठरला आहे.
साहित्य चळवळीला झोकून देऊन काम करणारे मनोज जानू जाधव या जाणकार व सामाजिक भान असलेल्या कवी आणि लेखकाची गुजरात अक्षरमहोल तिथलं वलसाड येथे राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्र साहित्यिक, साहित्यिक प्रेमींनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.