(संगलट / इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील जि.प.मराठी प्रभाग शाळा गावतळे येथे प्रभागस्तरीय शिक्षण परिषद शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांचे अध्यक्षतेखाली, गावच्या सरपंच विधी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विल्सन पवार यांचे प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी कोंढे नं.१ शाळेतील सौ.लिंगायत यांनी सुस्वर प्रार्थना गायन केली, तर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागतगीत गायन केले. तद्नंतर मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन प्रत्यक्ष परिषदेस प्रारंभ झाला.
प्रारंभी पदवीधर शिक्षक यशवंत भुवड यिंनी NEP राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा विषयक सखोल विवेचन केले. यामध्ये१९४८ पासून नव्या शै.धोरणाची वाटचाल कशी झाली हे सांगत बदलते शैक्षणिक धोरण कसे उपयुक्त आहे याबद्दल सविस्तर माहिती भुवड यांनी दिली. तर भडवळे शाळेतील उपशिक्षिका किरण पाठार यांनी पायाभूत चाचणी, संकलित चाचणी नियतकालिक विषयी मूल्यांकन विषयक ओघवत्या शैलीत थोडक्यात मार्गदर्शन केले. मध्यंतरात २०१९ मधील नवनियुक्त शिक्षकांकडून सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. यानंतर नुकत्याच झालेल्या इस्त्रो-नासा चाळणी परीक्षेत गावतळे प्रभाग अव्वल आल्याबद्दल कोंढे, देगाव, दमामे, फणसू, साखळोली आदि शाळांचा तसेच बदलीने गेलेल्या आणि नव्याने प्रभागात आलेल्या शिक्षकांचा व गत वर्षातील शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक कोंढे नं३,आणि करंजाळी नं१ शाळेतील शिक्षकांचा, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रविकिरण बुरटे आणि याच महिन्यात निवृत्त होणारे सुनिल येलवे यांचा सत्कार करणेत आला.
यानंतर फणसू केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव फल्ले यांनी Slas अर्थात राज्यस्तरीय उपलब्धी सर्वेक्षण विद्यार्थी सर्वांगिण विकासासंबंधी अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील फरक, संदर्भात सोदाहरण माहिती दिली, तर कोळबांद्रे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय मेहता यांनी( Nas)राष्ट्रीय स्तरावरील उपलब्धी सर्वेक्षणांतर्गत दर तीन वर्षांनी केंद्रशासन आणि NCERT मार्फत घेतल्या जाणार्या विविध वर्गांच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. यानंतर शिरवणे नं.२ शाळेतील शिक्षक शेखर फुलारी यांनी शाळेत उपलब्ध असणार्या विविध पेट्यांचा शैक्षणिक विकासात वापर आणि त्याचे सकारात्मक परिणाम सांगत असतांना मौखिक ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकाद्वारे मिळणारे ज्ञान चिरकाल टिकते असे सांगितले.
शेवटी अध्यक्षीय मनोगतात विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी दिवसभर चाललेल्या परिषदेचा मागोवा घेत आपल्या गावतळे प्रभागाची वाटचाल गत दोन वर्षापासून चांगल्या प्रकारे सुरु असून आपण सर्व शिक्षकांच्या विद्यार्थी विकासासाठीच्या योगदानाने प्रभावित झालो असून; सर्वांनी प्रभागाचे आपल्या केंद्राचे आणि पर्यायाने आपल्या शाळेचे नाव कसे उज्वल होईल यासाठी प्रयत्नरत रहावे.तुम्हा सर्वांमुळे प्रभागाला वेळोवेळी शिष्यवृत्ती, क्रीडास्पर्धा, आणि इस्रो-नासा परीक्षा आदि.मध्ये यशाचा मान मिळत आहे.चांगले काम करणार्यांच्या पाठीशी आपण कायम आहोत असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी मुख्याध्यापक सत्यप्रेम घुगे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
यावेळी गावच्या सरपंच विधी पवार,विल्सन पवार, विस्तार अधिकारी बळिराम राठोड,करंजाळी आजी-माजी केंद्र प्रमुख सुरेंद्र खताते, रविकिरण बुरटे, पन्हाळेकाजीचे सुनिल येलवे, उन्हवरेचे सदानंद रसाळ, कोळबांद्रे केंद्रप्रमुख संजय मेहता प्रभागातील शिक्षक,अंगणवाडी सेविका, गावातील ग्रामस्थ असे सुमारे १५० लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन गुहागरकर यांनी केले.