( मुंबई / किशोर गावडे )
जे शिवसेनेच्या ४० आमदार गेले, १२ आमदार गेले आणि यांचे तेरावे घालायला आमचे गजाभाऊ गेले. तरी ज्या उत्साहाने तुम्ही उद्धवजी ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात याचा मला निश्चित अभिमान वाटतो.
ज्यानी खोके घेऊन आता बोके होऊन शिवसेनेशी गद्दारी केली, ते आमदार आणि खासदार उद्धवजींच्या आजारपणात सोडून गेल्यानंतर “टायगर अभी जिंदा है” याची चीड आज लाखो शिवसैनिकांमध्ये कायम आहे. त्यामुळे सामान्य शिवसैनिक आज मनातून संतप्त झालेला आहे. त्यांच्या मनात या गद्दारांविरोधात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. महाराष्ट्र संपूर्ण अक्षरशः पेटून उठलेला आहे, ही संतापजनक बाब आहे. अशा गद्दारांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय माझा शिवसैनिक स्वस्थ गप्प बसणार नाही, अशी संतप्त घणाघाती टीका व शाब्दिक हल्ला भास्कर जाधव यांनी केला.
शिवसेना शाखा क्रमांक 110 चे शाखाप्रमुख व संयोजक संदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 11 ते 22 नोव्हेंबर 2022 या कालावधीत महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन भांडुप पश्चिमेच्या तूळशेत पाडा येथील कैलास पार्क, पाटकर कंपाऊंड येथे केले होते. महाराष्ट्र महोत्सवाच्या मंगळवारी या सांगता समारंभात शिवसेना नेते, व प्रवक्ते आमदार भास्कर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शनपर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विभाग प्रमुख आमदार रमेश कोरगावकर, माजी नगरसेविका संगीता गोसावी, दीपमाला बढे, उमेश माने, राजेश्वरी रेडकर, उपविभाग प्रमुख सुरेश शिंदे, पराग बने, राजेंद्र मोकल, अनंत पाताडे, उपविभाग संघटक संगीता पेडणेकर, सुगंधा वाफारे, पल्लवी पाटील, रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख शांताराम चव्हाण,
तसेच भांडुप मुलुंड विधानसभा मतदारसंघातील सर्व महिला पुरुष उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख गटप्रमुख, शिवसैनिक सर्व युवासेना, पदाधिकारी व युवासैनिक तसेच शिवसेना अंगीकृत संघटना व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार भास्कर जाधव आपल्या भाषणात म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा ढोंगी व विश्वासघातकी पक्ष असून या पक्षाने युती करून शिवसेनेच्या मानेला नख लावण्याचे पाप केल्याचा थेट आरोप भास्कर जाधव यांनी यावेळी केला.
भास्कर जाधव यांनी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या आमदार ऋतुजा रमेश लटके यांच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात घडलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी संदर्भासहित स्पष्टीकरण करण्याचा उलगडला केला.
भाजपने केलेली खेळी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रचलेले कुटिल कारस्थान आणि नंतर घेतलेली माघारी याचा खरपूस समाचार भास्कर जाधव यांनी आपल्या सडेतोड प्रभावी शैलीत केला. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. पण भांडुपच्या शिवसैनिकांनी आता मुलुंडकडेही लक्ष देण्याची खरी गरज असल्याचे सूतोवाच भास्कर जाधव यांनी केले.
महाराष्ट्रातील व मुंबईतील बाहेर चाललेले उद्योग व्यवसाय व अंधेरीतील सिप्झ कंपनीतील काही उद्योग हे गुजरात मध्ये नेण्याचं कटकारस्थान भाजपा व बोके सरकार करत असल्याचा थेट आरोपही विभाग प्रमुख आमदार रमेश कोरगावकर यांनी यावेळी केला.
यावेळी, माजी नगरसेविका दिपमाला बढे, सुरेश शिंदे यांनी आपल्या मनोगतातून महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक शाखाप्रमुख संदीप मयेकर यांच्या कार्याची स्तुती केली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक शाखाप्रमुख संदीप मयेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे निवेदन किरण खोत यांनी खुमासदार शैलीत केले.