इंग्लंडने विश्वचषक 2019 चे विजेतेपद पटकावले होते आणि यावेळी देखील हा संघ प्रबळ दावेदारांपैकी एक मानला जात होता, परंतु संघाची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना उपांत्य फेरी गाठणे देखील फार अवघड आहे. 4 सामन्यांपैकी केवळ 1 विजयासह, गतविजेता इंग्लंड गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे. आता जर संघाला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्यांना उर्वरित सर्व सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील.
इंग्लंडचा पुढचा सामना गुरुवार, 26 ऑक्टोबरला श्रीलंकेशी होणार आहे. यानंतर इंग्लिश संघ रविवारी, 29 ऑक्टोबर रोजी लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर यजमान भारताशी भिडणार आहे. भारतानं या स्पर्धेत एकही सामना गमवालेला नाही. पाच विजय अन् 10 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे इंग्लंडसमोर भारताचं तगडं आव्हान असणार आहे. त्यानंतर जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा पुढील सामना 04 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 08 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध आणि 11 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध शेवटचा सामना खेळला जाईल.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा 9 विकेट्सनं पराभव झाला. यानंतर संघाने पुनरागमन करत दुसऱ्या सामन्यात बांगलादेशचा 137 धावांनी पराभव केला. त्यानंतर अफगाणिस्तानने इंग्लिश संघाचा 69 धावांनी पराभव करत स्पर्धेत मोठा उलटफेर निर्माण केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या संघाला 229 धावांनी पराभवाचा धक्का दिला.
चार सामने खेळलेल्या इंग्लंड संघाला अजून 5 साखळी सामने खेळायचे आहेत. पुढील पाच सामन्यांमध्ये इंग्लिश संघ एकही सामना हरला तर उपांत्य फेरीतून बाहेर पडेल हे निश्चित कारण सर्व सामने जिंकूनही इंग्लंडला इतर संघांच्या नेट रनरेटवर अवलंबून राहावे लागू शकते. अशा परिस्थितीत एकही सामना गमावणे म्हणजे इंग्लंडसाठी विश्वचषक गमावल्यासारखे होईल. पुढील काही सामन्यांमध्ये इंग्लंड किती सामने जिंकतो हे पाहणे आता महत्वाचे आहे.