(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
तालुक्यातील कोंड असूर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील व गणेश मूर्तिकार श्री. हेमचंद्र जनार्दन पवार यांनी आपल्या गणेश चित्रशाळेची वाटचाल तब्बल पन्नास वर्षे पूर्ण होऊन यंदाचे ५१ व्या वर्षीही सुरू आहे.
सुरुवातीच्या काळात वडील कै. श्री जनार्दन सखाराम पवार यांनी देवरुखचे बाटक्के यांच्याकडे शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कला अवगत केली. त्यानंतर आपल्या कोंडअसूर्डे येथील आपल्या राहत्या घरी कारखाना सुरू केला. त्यांनी त्या काळात 25 गणपती काढून आरंभ केला. कलावंत जनार्दन पवार हे ग्राहकाने दाखविल्यानुसार कॅलेंडरवरील चित्र ते हुबेहुब शाडूमातीपासून मूर्ती तयार करायचे. हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या गणपती मुर्त्याना फुणगुस, कोंडचे देवघर अशा वेगवेगळ्या गावातून मोठी मागणी असायची.
अनेक वर्ष पवार यांनी स्वतः कारखाना चालवला. पुढे हेमचंद्र हा मोठा मुलगा होतकरू झाला. वडिलांच्या कडेला बसून मातीपासून छोटे-छोटे गणपती आवडीने बनवू लागला. काही वर्षांनी वडील जनार्दन पवार हे निर्वतले. आई श्रीमती निशिगंधा यांनी कलावंत हेमचंद्र व रवींद्र हे कलेत पारंगत व्हावेत यासाठी सतत प्रोत्साहन व प्रेरणा दिली. आजही आई कामात जमेल तेवढी मदत करतात. भाऊ रवींद्र काका मुरलीधर व दिलीप यांची उत्तम साथ मिळत आली आहे. तसेच पत्नी मनीषा यांचे मोलाचे सहकार्य लाभते आहे. शाडूमातीपासून विविधता दाखवून सहयोग देणारे जेष्ठ कलाकार श्री शशिकांत उर्फ बावा परकर, प्रशांत शिंदे, आनंद शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे .
सध्या श्री हेमचंद्र यांनी आपल्या कारखान्यात तीनशेच्या आसपास रेखीव व आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. सर्वात मोठी मूर्ती चार फुटी आहे. त्यांच्या मुर्त्यांना आंबेड, बुरंबी ओझरखोल फुणगुस, संगमेश्वर, कसबा, देवघर, धामणी, आधी गावातून मोठी मागणी आहे. भजन कलेच्या परंपरेबरोबर मातीकला व रंगकला कौशल्य जपणारे एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे कोंड असूर्डेचे कलावंत श्री. हेमचंद्र जनार्दन पवार अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा अनुभव प्रत्यक्षात ऐकताना मनभक्तिमय होऊन जाते. यामुळे आई श्रीमती निशिगंधा जनार्दन पवार यांच्या डोळ्याचे पारणे फिटले आहे.