रत्नागिरी:- कोरोना महामारीमध्ये एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गणेशोत्सवाने एसटीला मोठा आर्थिक हात दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुमारे १ हजार २९ एसटी फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला २ कोटी ७१ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा चांगल्या स्वरूपात गणेशोत्सव झाला. उत्सवासाठी यंदा जिल्ह्यात तब्बल १ लाख ९१६ मुंबईकर दाखल झाले. यामध्ये रेल्वेद्वारे ३१ हजार ९०, बसद्वारे २४ हजार ८५८, खासगी वाहनातून २२ हजार २९९, खासगी आराम बसने २२ हजार ६६९ लोक जिल्ह्यातील शहर आणि गावांमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी १ हजार १०० एसटी बसेस मुंबईतून दाखल झाल्या होत्या. गणेशोत्सवात १४ सप्टेंबरपासून ते २२ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्याचे नियोजन रत्नागिरी एसटी विभागातून करण्यात आले होते. १ हजार २९ गाड्या मुंबईला रवाना झाल्या. त्यामध्ये २५० ग्रुप बुकिंगच्या गाड्यांचा समावेश होता.
रत्नागिरी विभागाने यावर्षी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या गावी एसटीची उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार २३० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एसटीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुंबईकरांची गैरसोय दूर झाली.
गतवर्षी २००७ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या; मात्र गतवर्षी प्रवासी क्षमतेपेक्षा निम्म्या प्रवासी वाहतुकीला परवानगी होती. त्यामुळे गतवर्षी जादा गाड्या गेल्या असल्या तरी यावर्षी गाड्या कमी असताना पूर्ण क्षमतेने भरून असल्याने एसटीच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली. गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध कडक होते शिवाय मुंबईतून आलेल्या गाड्या थेट कोरोना केंद्रावर तपासणीसाठी नेण्यात येत होत्या. त्यामुळे गतवर्षी आलेल्या गाड्यांची संख्या अत्यल्प होती तसेच लॉकडाउन काळात आलेल्या प्रवासी गणेशोत्सवानंतर मुंबईकडे रवाना झाले होते. यावर्षी शासकीय निर्बंध शिथिल असल्यामुळे येणाऱ्या तसेच जाणाऱ्या गाड्यांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेली दीड वर्षे मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला गणेशोत्सवात २ कोटी ७१ लाखाचा मोठा आर्थिक हातभार लागला.