(देवरुख)
कोकणातील मुख्य उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवासाठी चाकरमान्यांची मोठ्या संख्येने गर्दी असते. देवरुख शहर हे मुख्य बाजारपेठ असल्याने उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असते. त्यात सध्या वाहनांची रहदारी वाढली असल्याने ग्राहकांना रस्त्यावरून चालायचे कसे याचा प्रश्न पडत आहे.
रविवार 28 ऑगस्ट 22 रोजी आठवडा बाजार असल्यानेही ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. परंतु स्थानिक प्रशासन व इतर विभागांनी याकडे दुर्लक्ष केलेले असून जनतेचे वाली कोणी राहिलेले नसल्याने अंदाधुंदी माजली आहे असे चित्र होते. वाहने वाट्टेल तशी लावली जात असल्याने ट्रॅफिक जाम झालेले दिसत आहे. त्यातच रविवार बाजार असल्याने मोठी, अवजड वाहने भर बाजारात उभी करून आपला माल उतरवित होते. त्यात पोलीस यंत्रणेने कोणतीही सुरक्षितता केलेली नाही.
प्रशासनाचा नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना, वाहनधारकांना त्याच प्रमाणे व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, तसेच तहसीलदार आज सोमवारी प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.