(रत्नागिरी)
पुढील महिन्यात गणेशाचे आगमन होणार आहे. सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यात व्यवसायिकांच्या स्वच्छतेविषयीची कडक तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रसाद, मिठाईची खरेदी केली जाते. विविध मिठाईच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने तपासणी अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या अंतर्गत उत्पादन आणि विक्री जागेवर करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, हे पाहिले जाणार आहेत.
अन्नपदार्थ उत्पादनासाठी वापरण्यात येणारे पाणी योग्य असल्याचे विश्लेषण करून घ्यावे त्यानंतरच ते वापरावे. जिल्ह्यातील मिठाई, मोदक तसेच फरसाण उत्पादक व अन्न व्यावसायिकांनी स्वच्छतेसंदर्भात विशेष काळजी घ्यावी. सर्व अन्न उत्पादन व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणासंदर्भात प्रशिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अन्न व्यावसायिकांनी मिठाईची विक्री करताना ट्रे, पाकिटावर बेस्ट बिफोर युज बाय डेट तसेच उत्पादन दिनांक, अन्न नोंदणी, अन्न परवाना क्रमांक आदी माहिती देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ-मिठाई यांची विक्री केल्यानंतर विक्री बिल ग्राहकाला देणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बिलावर अन्न परवाना क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव काळात तयार मोदक असलेली त्रिकोणी, षट्कोनी, आयताकृती आकारातील मीठाईचे खोके विकत घेतात. त्यावरील उत्पादन दिनांक व अन्य माहिती तपासावी आणि मगच खरेदी करावी. मिठाईची खरेदी करताना ग्राहकांनी ट्रे पाकिटावर बेस्ट बिफोर युज बाय डेट तसेच उत्पादन दिनांक, अन्ननोंदणी, अन्न परवाना क्रमांक इत्यादी माहिती बघून तपासूनच खरेदी करावे व त्या बाबतचे खरेदी बिल घेण्यात यावे. जेणेकरून फसवणूक झाल्यास पुरावा सादर करता येईल. जर अशा स्वरूपाची माहिती नसेल तर पदार्थ खरेदी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.