(गणपतीपुळे/वैभव पवार)
प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्या गणपतीपुळे येथील फेरीवाल्यांसह पर्यटकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी ग्रामपंचायतीने घ्यावी अशा सुचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या. विविध विकासकामांच्या भुमीपुजन कार्यक्रमासाठी मालगुंड, गणपतीपुळे दौर्यावर असलेल्या मंत्री सामंत यांनी रविवारी (ता. 8) सकाळी गणपतीपुळे किनार्यावरील फेरीवाल्यांशी संवाद साधला.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी आहे. दर दिवशी हजारो पर्यटक मंदिरासह किनार्यावर येऊन जात आहेत. पर्यटकांची गर्दी पाहिल्यानंतर मंत्री सामंत यांनी मंदिर परिसरासह किनार्यावरील फेरीवाल्यांशी संवाद साधला. त्यांना येणार्या अडचणी जाणून घेतल्या. पर्यटकांना कोणत्या अडचणी येत आहेत का याबाबतही त्यांनी आढावा घेतला. ग्रामपंचायतीकडून फेरीवाल्यांना सहकार्य मिळावे यादृष्टीने मंत्री सामंत यांनी सुचना दिल्या आहेत. किनार्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या जीवरक्षकांचीही त्यांनी चौकशी केली. अंगारकी चतुर्थीवेळी केलेल्या नियोजनानुसार किनार्यावर जीवरक्षक आहेत का याची माहितीही त्यांनी घेतली. जीवरक्षकांची नियुक्ती कायमस्वरुपी कशी करता येईल यासंदर्भात मंत्री सामंत यांनी पावले उचलली जातील असे आश्वासन दिले आहे.
यावेळी त्यांचे समवेत गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सदस्य संजय माने, कोतवडे जिल्हा परिषद गटाचे समन्वयक अमित घनवटकर उपस्थित होते.