(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी मोठ्या लाटेच्या तडाख्याने समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच आलेल्या पर्यटकांमधून सुमारे १० ते १२ जणांना जखमी व्हावे लागले. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी चे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज गणपतीपुळे येथे भेट देऊन गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील स्थानिक व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून समुद्राच्या धोक्याबाबत माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्त एकूण ४९ स्थानिक व्यावसायिकांना दिलासा देताना शासनामार्फत तातडीने येत्या काही दिवसांत प्रत्येकी ५४०० रुपयांची आर्थिक मदत आणि ज्या स्थानिक व्यावसायिकांचे सुमारे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, अशा नुकसानग्रस्त व्यावसायिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत आपल्या सामंत कुटुंबियांकडून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्वच स्थानिक व्यावसायिकांकडून पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या भेटीत पालकमंत्री उदय सामंत यांनी पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत आवाहन करताना सांगितले की, येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने शासनाच्या नियम व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.तसेच गणपतीपुळे समुद्राची सध्याची धोक्याची स्थिती लक्षात घेऊन कुठल्याही पर्यटकाने समुद्रस्नानासाठी उतरण्याचा अट्टाहास करू नये,असे म्हटले आहे. तसेच गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या निर्णयाला ही पर्यटकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.तसेच पुढील वर्षी समुद्राच्या मोठ्या लाटांबाबत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल,अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
यावेळी त्यांचे समवेत रत्नागिरी चे प्रांताधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी, रत्नागिरीचे तहसीलदार गोसावी व अन्य शासकीय अधिकारी तसेच बाळासाहेबाची शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष तथा रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित सभापती गजानन पाटील,कोतवडे जिल्हा परिषद गटातील युवासेना समन्वयक अमित घनवर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रकाश साळवी, तारक मयेकर, गणपतीपुळे सरपंच कल्पना पकये आदींसह सर्व ग्रा.पं. सदस्य व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.