(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील सुर्वे स्टॉप ते निवेंडी भगवतीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील भेल्या पऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गेल्या महिन्यांपूर्वी गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातील कामे चालू होती. या पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाण्याची गटार लाईन खोदण्यासाठी सुर्वे तिठा ते भेल्या पऱ्या तसेच कोल्हटकर तिठा ते मोरया चौक असे रस्ते खोदून सांडपाण्याचे चेंबर बांधण्यात आले होते. त्यानंतर पाऊस जवळ आल्यावर रस्त्यांची कामे हातात घेण्यात आली होती. त्यामध्ये येथील दोन्ही रस्ते करताना संबंधित ठेकेदाराने यामध्ये किती प्रमाणात डांबर वापरले हा संशोधनाचा विषय असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
सध्या गणपतीपुळे भेल्यापऱ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याच रस्त्यावर गोताडवाडी नजीक मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येते आहे. या ठिकाणावरुन शाळेतील लहान मुले तसेच कामावर जाणारे ग्रामस्थ पायी प्रवास करत असतात. त्यामुळे येता जाता या पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमधून साचलेले पाणी त्यांच्या अंगावर उडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र याकडे संबंधित बांधकाम खाते डोळेझाक का करीत आहे असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.
तसेच कोल्हटकर तिठा ते मोरया चौक या रस्त्यावरही हॉटेल सचिनच्या समोर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याचे चिखल पाणी सुद्धा ग्रामस्थांसह शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असते. दररोज या गोष्टींचा सामना शालेय विद्यार्थी ग्रामस्थांना करावा लागत आहे. तरी संबंधित ठेकेदार व संबंधित प्रशासनाने त्वरित यावर मार्ग काढून ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना हाती यावी, असे मत येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.