(रत्नागिरी)
तालुक्यातील तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे गावामधील एसटी स्टँड परिसरातील खड्डे रिक्षा व्यावसायिकांनी दगड आणि मातीच्या साह्याने भरले. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गेले अनेक दिवस जोरदार पडणाऱ्या पावसामुळे गणपतीपुळे एसटी स्टँड परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या सागरी महामार्गावर असल्याने याबाबत येथील ग्रामस्थांनी तसेच वाहनधारकांनी, रिक्षा चालकांनी संबंधित खात्याशी संपर्क केला. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मंगलमूर्ती रिक्षा मालक-चालक व व्यावसायिकांनी येथील मोठे खड्डे दगड आणि मातीच्या साह्याने भरले. त्यामुळे या मार्गावरून जाणारे येणारे प्रवासी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी उडण्याचा त्रास सध्या तरी बंद झाला आहे.
खड्डे रिक्षा व्यावसायिकांनी बुजवले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले कर्मचारी पाठवून गणपतीपुळे कोल्हटकर तिठा ते एसटी स्टँड परिसर या मार्गावर पडलेले खड्डे बुजवून होणाऱ्या अपघातांना आळा घालावा, असे मत येथील स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले.