(नवी दिल्ली)
केंद्र सरकारनं सोमवारी (१ जानेवारी) गँगस्टर गोल्डी ब्रारला यूएपीए कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केलं. गृह मंत्रालयानं जारी केलेल्या नोटीसमध्ये गोल्डी ब्रार प्रतिबंधित खलिस्तानी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’शी संबंधित असल्याचं म्हटलंय. गृह मंत्रालयानं म्हटलं की, गोल्डी ब्रारला सीमापार दहशतवादी एजन्सींचं समर्थन आहे. तसेच तो अनेक हत्यांमध्ये सामील आहे. याशिवाय, अनेक मोठ्या नेत्यांना धमकीचे कॉल करणे, खंडणीची मागणी करणे आणि विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येच्या धमक्या देणे, यामध्ये तो सहभागी आहे.
गृह मंत्रालयानं सांगितलं की, गोल्डी ब्रार सीमेपलीकडून ड्रोनद्वारे उच्च दर्जाची शस्त्रं, दारूगोळा आणि स्फोटक सामग्रीची तस्करी करण्यात आणि हत्या करण्यासाठी शार्प शूटर्सना पुरवण्यात गुंतला आहे. कॅनडास्थित गोल्डी ब्रारनं २०२२ मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारीही स्वीकारली होती. मूसेवाला याची मे २०२२ मध्ये पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी ब्रारला या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलंय.
परदेशात राहणारे असे गुन्हेगार भारतात टार्गेट किलिंग आणि ड्रग्जचा व्यवसाय पुढे करत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले. याशिवाय भारतात या गुंडांचे टोळके अवैध शस्त्रांच्या तस्करीसह इतर प्रकारचे गुन्हे करत असतात. त्या गुंडांच्या नावांची यादी भारत सरकारच्या अंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) तयार केली आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ब्रार आणि त्याचे साथीदार पंजाबमधील शांतता, जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत आहेत. यामध्ये तोडफोड, दहशतवादी मॉड्यूल्स उभारणे, टारगेटेड हत्या करणं आणि इतर देशद्रोही उपक्रमांचा समावेश आहे. गोल्डी ब्रार विरुद्ध इंटरपोल सेक्रेटरीएट जनरल (IPSG) ने रेड कॉर्डर नोटीस जारी केली आहे. तसेच १२ डिसेंबर २०२२ रोजी त्याच्याविरोधात एक अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं होतं.