(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी डीएसपी बंगल्यानजीक थिबा राजाच्या मूर्तीस्थळी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वा जयंती महोत्सव संयुक्त उत्सव समितीचे धडाडीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रकाश नाईक यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात प्राध्यापक प्रकाश नाईक म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतीयांचे नेते होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे भारतीय समाजव्यवस्थेला पुढे नेणारे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या कल्याणासाठी आहे. बाबासाहेब केवळ एका जातीपुरते किंवा काही घटकांपुरते मर्यादित नसून त्यांनी अविरतपणे कलेले कार्य तेजस्वी सूर्यासारखे संपूर्ण भारतीय व जगभरातील शेतकरी कामगार,स्त्रिया व वंचित घटकांसह सर्वव्यापी स्वरूपाचे आहे. हे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
सर्व भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास अतिशय चिकित्सक पद्धतीने अभ्यासावा.ओबीसी वर्गाच्या कल्याणासाठी हिंदू कोड बिल तसेच देशातील कष्टकरी,कामगार , आदिवासी शेतकरी, महिलांसाठी केलेले कार्य कोणालाही नाकारता येणार नाही. यावेळी त्यांनी बुद्ध,कबीर, फुले, शाहु कालीन अनेक ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देत विज्ञानवादी डोळस इतिहास उपस्थितांपुढे मांडला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान व मानवी कल्याणाचे कायदे अबाधित राखण्यासाठी आंबेडकरी जनतेने जागरूक राहण्याचे त्यांनी कळकळीचे आवाहन केले.
संयुक्त सभेच्या भव्य आयोजनाबद्दल उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार तसेच भारतीय बौद्ध महासभेचे व उत्सव कमिटीचे सचिव विजय मोहिते तसेच दोन्ही धार्मिक शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला , तरुणांच्या योगदानाबद्दल प्रा.नाईक यांनी आनंद व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द काश्मीर फाईल चित्रपट पहाण्यासाठी आग्रह धरत आहेत.मग आता खैरलांजी अत्याचार प्रकरणावर आधारित वास्तववादी चित्रपट निर्मितीसाठी पुढाकार घेऊन मोदींनी असे चित्रपट देशापुढे आणण्याची परखड भूमिका प्राध्यापक नाईक यांनी यावेळी मांडली. हेही वास्तव देश पाहूदे असे ते म्हणाले.
यावेळी स्वागताध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकृत करण्याची गरज असल्याचे सांगितले.जयंती उत्सव साजरा करण्यासाठी दोन्ही शाखांनी दिलेल्या योगदानाबद्दल प्रकाश पवार यांनी समाधान व्यक्त करून उपस्थित जनतेला मनापासून धन्यवाद दिले.
या कार्यक्रमासाठी संयुक्त समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .यामध्ये यामध्ये उत्सव समितीचे सचिव विजय मोहिते, सुहास कांबळे, नरेंद्र आयरे,तुषार जाधव यांसह तालुक्यातून मंगेश सावंत, तु.गो. सावंत,भगवान जाधव, रत्नदीप कांबळे ,नंदकुमार यादव, प्रितम आयरे, दीपक पवार, शिवराज यादव, विलास कांबळे, सदानंद पवार,भाई जाधव, रजत पवार तसेच भारतीय बौद्ध महासभा व बौद्धजन पंचायत समितीचे अनेक मान्यवर पदाधिकारी, महिला, युवाशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी लक्षवेधी चित्ररथ मिरवणूक रत्नागिरी शहरातून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये काढण्यात आली.
या मिरवणुकीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणकरून करण्यात आला. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच जयंती दिनाचं औचित्य साधून सामाजिक व धार्मिक चळवळीतील कार्यकर्ते, गायक रविकांत पवार (मालगुंड -रत्नागिरी)आणि त्यांचे सहकलाकार यांनी अतिशय बहारदार व स्फुर्तिदायी बुद्ध व भीम गीते सादर करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध पूजापाठ करून करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मोहिते तर आभार सुहास कांबळे यांनी मानले. जयंती उत्सवाला सहकार्याचा, योगदानाचा, मदतीचा हात देणाऱ्या अनेक दानशूर देणगीदारांप्रती संयुक्त उत्सव कमिटीने कृतज्ञता व्यक्त केली.