( खेड / प्रतिनिधी )
कशेडी घाटातील अपघातप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसुंदर पांडे (सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गौहर नबी वाणी (43, कांदिवली, मुंबई) यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामसुंदर पांडे हा आपल्या ताब्यातील ट्रक (जीजे 15 एव्ही 0424) घेवून कशेडी घाटातून जात असताना तीव्र उतारावर आणि वेडीवाकडया वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुढे जाणार्या मारुती सुझुकी स्वीफ्टला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गौहर नबी वाणी हे जखमी झाले. त्यांना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गाडीच्या नुकसानीस व गौहर वाणी यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक रामसुंदर पांडे याच्यावर भादविकलम 279, 338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.