(खेड/इक्बाल जमादार)
तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडीया या बँकेमध्ये ग्राहकांची नेट अभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या बँकेमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून रांगा लागलेल्या असतात. मात्र या बँकेमध्ये असणारे इंटरनेट अत्यंत धीम्या गतीने चालत असल्याने ग्राहकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे.
बुधवारी नेटच नसल्याने आणि ग्राहकानी कंटाळून परतीचा प्रवास धरला. सकाळपासून रांगा लावून देखील दुपारपर्यंत नंबर लागत नाही. नेटच्या अभावामुळे दुसऱ्या दिवशी या असे सांगण्यात येते.
सध्या एसटीचा संप मिटला असला तरी अनेक गावांमधून अद्याप एसटीच्या गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे बँकेत येणाऱ्या ग्राहकाला एक तर पायी अथवा खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. बॅंकेत येण्याकरिता दोनशे ते तीनशे रुपये खर्च करावे लागतात. शिवाय काम होईलच असे नाही. त्यामुळे खर्चही वाया आणि पैसेही वाया जातात. दुसर्या दिवशी पुन्हा प्रवास तेवढाच खर्च होतो यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत.
बॅंकेसमोर पार्किंग सोय नसल्याने अनेक अडचणीना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर बाचाबाची होण्याचे प्रकार घडत आहेत. बँकेच्या समोरचा रस्ता अरुंद असल्याने गाड्या उभ्या करता येत नाही. ग्राहकांना होणारा मनस्ताप थांबावा अशी मागणी होत आहे.