(खेड)
सुमारे आठ वर्षांपूर्वी खेड तालुक्यातील आवाशी देऊळवाडीतील ओंकार तुकाराम कदम या तरुणाचा निघृण खून करणाऱ्या सहाजणांना येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आज गुरुवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. ओंकारच्या खूनप्रकरणी दीपक वामन आंब्रे (४०, रा. आवाशी), उमेश चंद्रसेन आंब्रे (३४, रा. आवाशी), विक्रम सिंग भागसिंग मेश्राम (३४, रा. मध्यप्रदेश), सागर पाटील (३५, रा. लोटे), संदीप हरिश्चंद्र आंब्रे (४५), उमेश नारायण आंब्रे (४५, दोघेही रा. आवाशी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. या खूनप्रकरणी या सहाजणांविरोधात भादंवी कलम ३०२, २०१,१२० ब १०९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाची येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी ओमकारचे वडील सातत्याने सुनावणीला हजर होते. तर या प्रकरणात तब्बल ३७ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. तसेच सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी मयत ओमकारच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केले. अखेर सुनावणीअंती येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी सहाजणांना आजन्म कारावास, प्रत्येकी १० हजार रुपये दंड, हा दंड न भरल्यास सहा महिने कारावास व १२० ब नुसार ३ वर्षे शिक्षा सुनावली आहे.