(खेड / भरत निकम)
शिवाजी चौक येथील मनसेच्या हंडीचा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह असताना तीनबत्तीनाका येथे आजी माजी आमदार यांच्या दोन्ही स्वतंत्र हंड्यांसह भरणेनाका येथील खेड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नव्याने हंडी उभारली असून रात्री उशिरापर्यंत गोकुळाष्टमी उत्सवाची रंगत यंदा आणखीनच वाढणार आहे. ग्रामीण भागातील हंड्या दुपारी फोडून शहरातील हंडीच्या कार्यक्रमात नागरिक सहभागी होतात. त्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सर्वच ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
खेड तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सुरु होतो. गावागावात स्थानिक ग्रामस्थ शक्ती-तुरा आणि महिलांच्या फुगडी कार्यक्रमातून हा सण साजरा केला जातो. श्रीकृष्ण पुजेनंतर प्रथेप्रमाणे बाळ गोपाळ गोविंदा हंडी फोडून उत्सवाला सुरुवात करतात. त्यानंतर सकाळी गावच्या मंदिरासमोर किंवा नियोजित ठिकाणी हंडी उभारुन फोडली जाते. हि प्रथा आणि परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आजही येथे सुरु आहे. शहरासह परिसरातील गावांमध्ये हाच उत्साह पहावयास मिळतो. भरणे, वेरळ, सुकिवली, भडगाव, भोस्ते, सुसेरी येथेही उत्सवाचा रंग चढलेला दिसतो. शहरातील महाडनाका, स्टॅण्डचा परिसर, वाणीपेठ, बाजारपेठ, कुंभारआळी, वाल्कीगल्ली, कुंभारवाडा, साळीवाडा, पावसकर नाका, शिवतर रोड अशा विविध ठिकाणी हंडीचा उत्साह कायम असतो. शहरासह बाहेरच्या तालुक्यातील गोविंदा पथके मोठमोठे मानवी मनोरे रचून हंडी फोडत असतात. नाक्यानाक्यावर दहीहंडी सणाचा उत्साह संचारलेला दिसून येतो. दहीहंडीच्या गाण्यांवर तरुणाईसह अबालवृद्ध थिरकताना दिसतात. उद्या सकाळी पासून सुद्धा हाच हंडीचा जल्लोष दिसून येणार आहे.
खेड शहरातील नाक्यांवर मुंबई, ठाणे येथील हंडी उत्सवाच्या धर्तीवर हा ट्रेंड आल्याने राजकारणी मंडळी उंच उंच हंड्या बांधून उत्साहाला उधाण आणत आहेत. मनसे व राजवैभव प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवाजीचौक येथे करतात. यंदा येथे ५१ हजारांचे बक्षीस असून प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ, गोविंदा पथकाकडून सलामीला रोख बक्षीस आणि मुंबईतील नामवंत नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. यावर्षीपासून नव्याने भरणेनाका येथे राष्ट्रवादीतर्फे तालुकाध्यक्ष उमेश कदम यांनी १ लाख ११ हजार १११ अशा भरघोस रक्कमेची हंडी फोडायला गोविंदा पथकांना संधी दिली आहे. सलामी देणाऱ्या पथकांना बक्षीस देवून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शक्तीवाले सचिन कदम तर तुरेवाले किशोर सणस यांच्यात जाखडी लोकनृत्याचा बहारदार कार्यक्रम हंडीच्या व्यासपीठावर आयोजित केला आहे.
शहरातील तिनबत्तीनाका येथे शिवसेना शहर, युवासेना आणि आमदार योगेश कदम पुरस्कृत दहीहंडी उत्सव २०२३ चे आयोजन दिमाखात केले असून सलामीची बक्षिसे आणि इतर गोविंदा पथकांना थराच्या रचनेनुसार बक्षिस देणार आहेत. सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार हंडीच्या व्यासपीठावर उपस्थित राहुन वेगळ्या दिमाखात नृत्य सादर करणार आहेत. स्वतः आमदार योगेश कदम व त्यांचे सहकारी येथे उपस्थित राहुन प्रेक्षकांसह येथील उत्सव प्रेमींना व गोविंदा पथकांना भेटणार आहेत. संपूर्ण नाक्याच्या परिसरात विद्युत रोषणाईचा झगमगाट येथे केलेला आहे. शहरप्रमुख कुंदन सातपुते आणि सहकारी या उठावदार कार्यक्रमात आणखी रंगत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. खास मुंबईतील नावाजलेल्या डिझायनर कडून या उत्सवासाठी टिशर्ट मागविलेत. याच परिसरातील स्वर्गीय किशोरजी कानडे मैदान प्रवेशद्वाराजवळ माजी आमदार संजय कदम यांनी सहकारी वर्गाच्या मदतीने निष्ठावंत शिवसैनिकांची हंडी उभारली आहे. येथेही सिनेसृष्टीचे कलाकार हजेरी लावून व्यासपीठावर कला सादर करणार असून येथेही गोविंदा पथकांना बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. प्रेक्षक वर्गाच्या मनोरंजनाची व्यवस्थाही येथे केलेली आहे. स्वतः संजय कदम याठिकाणी हजर राहून कार्यकर्त्यांसोबत दहीहंडी उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यांनी उत्सवासाठी स्वतंत्र टिशर्ट छापून घेतले आहेत.
शिवसेना उबाठा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांकडून गोविंदा पथकांना लाखोंची बक्षिसे जाहीर केली आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवात खेडमधील आगळावेगळा अनुभव यावर्षी राजकीय नेत्यांनी यंदाही आणलेला आहे. परंतु कोणत्या ठिकाणी जास्त गर्दी प्रेक्षक करतात आणि थांबून राहतात, हे पहाणे सर्वांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. या उत्सवाकरीता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला असून गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली आहे.