( खेड / प्रतिनिधी )
लोटे एमआयडीसीमधील दोन कंपन्यांत स्थानिक पुढार्यांनी 3 कोटीच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरी प्रकरणी स्थानिक पुढार्यांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वास एन्टरप्रायझेस कंपनीतील क्रेनचा चालक मालक (नाव, पत्ता माहित नाही), दोन ट्रकचे चालक, मालक (नाव, पत्ता माहित नाही), हेव्हील लिफ्टर क्रेनचा चालक मालक, (एमएच 50, 1487) ट्रकचा चालक मालक, (एमएच 8, 0987) ट्रकचा चालक मालक, मुन्ना सिंग (लोटे), आसिफ मेमन (चिपळूण), यांच्यासह अन्य स्थानिक पुढारी लोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना 30 नोव्हेंबर 2019 ते 15 डिसेंबर 2019 या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी कंपनीतील इंडी डयुट मेटॉलो केमिकल्स प्रा. लि., मिशाल झिंक इंडस्ट्रिज प्रा. लि. या दोन बंद कंपनीतील साहित्य स्थानिक पुढार्यांसह 7 जणांनी चोरी केली. यामध्ये मोठे लोखंडी चॅनल, लोखंडी ट्रॅक, रिअॅक्टर, बॉयलर, लोखंडी चिमण्या, कंपनीच्या मशिनरी, लोखंडी शेड, लोखंडी भट्टी, लोखंडी ब्लोअर लाईन्स व इतर कंपनीचे जुने साहित्य मिळून 3 कोटीचे साहित्य चोरले. याबाबतची फिर्याद वैभव विलास आंब्रे (37, लोटे, एमआयडीसी, खेड) यांनी पोलीस स्थानकात दिली. यानुसार वरील संशयित आरोपींवर भादविकलम 380, 454, 457, 461, 436, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.