(खेड / भरत निकम)
क्रांती दिनानिमित्ताने खेडमध्ये 9 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सादर करताना या देशभूमीसाठी स्वातंत्र लढा दिलेल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना नमन केले जात आहे. देशाचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना भारतीय नागरिकांना आनंद होत आहे. त्याअनुषंगाने स्वातंत्र्य सैनिकांची विधवा पत्नी वयाच्या १०२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
स्वातंत्र्य सेनानी कै. महादेव मोरे हे सुभाषचंद्र बोस यांच्या आय एन ए या दलात कार्यरत होते. ही संघटना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होती. त्यांनी अनेक देशांतून ब्रिटीशांविरूद्ध लढा दिला व तरुण वयात त्यांचे निधन झाले. त्यांची पत्नी सौ. सरस्वती महादेव मोरे या लग्नानंतर तिसऱ्या महिन्यात विधवा झाल्या होत्या. आपल्या देशभक्त वीर जवान असलेल्या पतीवर जीवापाड प्रेम असल्याने त्यांनी त्या काळात पुर्नविवाह केला नाही. त्या आपल्या माहेरी पोलीस खात्यात नोकरीला असलेल्या आणि सध्या रिटायर झालेल्या भाऊराव भोसले यांच्याकडे राहिल्या. त्या गेली ९९ वर्ष भावासोबत वास्तव्य करीत आहेत.
गेली अनेक वर्षे त्यांच्या बद्दल केंद्र व राज्य शासनाकडून दखल घेतली नव्हती. याची माहीती त्यावेळचे जिल्हा सैनिक कार्यालयाचे प्रमुख कॅप्टन दळवी यांनी खेड येथील दौऱ्यात खेडचे सामाजिक कार्यकर्ते मेहबूब मोहिमतुले यांना सांगितली. त्यांनी १९९५ साली सरस्वती महादेव मोरे यांच्या सर्व कागदपत्रांसह दिल्ली येथे स्वातंत्र्य सैनिक कक्षाचे सचिव यांना भेटून त्यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण, विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी, प्राध्यापक मधु दंडवते त्यांच्या कडे निवेदन सादर करीत त्यांना न्याय मिळवून दिला. आज त्यांना केंद्र व राज्य सरकारची पेन्शन व अनेक सुविधा मिळत आहेत. आज वयाची १०० पार केलेल्या स्वातंत्र्य सैनिक पत्नीला गेले ३० वर्षाहून अधिक काळ पेन्शन व इतर सुविधांचा लाभ मिळत आहे.
सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे राष्ट्रीय संघटक मेहबूब मोहिमतुले यांनी क्रांती दिनानिमित्ताने त्यांच्या घरी खोपी येथे भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांचे भाऊ ९९ वर्षांचे निवृत्त मुंबई पोलीस सेवा बजावलेले भाऊराव भोसले त्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भारतीय वायुसेनेचे सेवानिवृत्त योगेश गोपाळ आपटे, खेड रेल्वे स्टेशन मास्तर व माजी सैनिक निलेश शंकर मोरे हे उपस्थित होते.