(खेड)
तालुक्यात १९ व २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान महावितरण कंपनीच्या खेड विभागांतर्गत येणाऱ्या लोटे उपविभागातील कर्जी शाखेतील ३३/११ के. व्ही आंबवली उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणारी मुख्य ३३ के.व्ही वाहिनी मौजे अंबवली येथे जगबुडी नदीपात्रात तुटून पडली होती. त्यामुळे २२ गावातील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता.
कार्यतत्पर महावितरण कर्मचाऱ्यांकडून विद्युत वाहिनी पुनर जोडणीसाठी प्रयत्न सुरू झाले, परंतु नदीतील पाण्याचा प्रवाह व नदीच्या पात्राची सुमारे ३०० मीटर रुंदी यामुळे काम करणे अवघड होत होते. याची कल्पना लोटे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नानोटे यांनी कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांना दिली, असता शिवतारे यांनी खेड तालुक्याच्या प्रांताधिकारी सौ. राजश्री मोरे व महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ कार्यालयाचे नवनियुक्त अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मदतीने जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली.
जिल्हाधिकारी सिंह यांनी क्षणाचाही विलंब न लावता चिपळूण येथे उपस्थित एनडीआरएफ टीम या कामासाठी तैनात केली, एन डी आर एफ टीम सह त्यांच्या चार होड्या महावितरण कर्मचारी व स्थानिक नागरीक यांच्यामार्फत दिनांक २१ पासून दिनांक २२ जुलै २०२३ रोजी रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम चालू होते. या कामात स्थानिक रहिवासी दाऊद दुदुके, खलील परकर, मोज्जम परकर व इतर रहिवासी यांनी आपल्या दोन होड्यांसह सहभाग घेऊन मोलाची मदत केली, नदीतील पाण्याचा प्रवाह व कामाचा आवाका बघता एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर जस्टिन जोसेफ आणि निरीक्षक अशोक कुमार यांच्या पथकाने केलेल्या या अत्यंत जोखमीच्या कामाचे कौतुक स्थानिक स्तरावरून करण्यात येत आहे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.