(नवी दिल्ली)
दोन आदिवासी समुदायांतील संघर्षामुळे मणिपूर गेले तीन महिने जळत आहे. तेथील हिंसाचाराचे पडसाद संसद अधिवेशनातही उमटले. देशातल्या तमाम विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ दोन दिवस मणिपूरला जाऊनही आले आणि आता खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सात जणांचे शिष्टमंडळ आज मणिपूरला रवाना होत आहे. विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सध्या पक्ष सोडण्याच्या चर्चेत असलेले जयंत पाटील या दौर्यात असणार नाहीत.
मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर देशातील 16 विरोधी पक्षांचे 21 खासदारांचे शिष्टमंडळ अलिकडेच दोन दिवसांच्या मणिपूर दौर्यावर जाऊन आले. या शिष्टमंडळात ठाकरे गटाच्या वतीने खासदार अरविंद सावंतही सहभागी झाले होते. मात्र राष्ट्रीय पक्ष अशी पक्षाची ओळख सांगणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार या शिष्टमंडळात सहभागी झाला नव्हता. या शिष्टमंडळाने मणिपूरला जाऊन आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. तेव्हा मात्र शरद पवार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह या भेटीच्या वेळी उपस्थित होते. नंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून मात्र त्यांनी काढता पाय घेतला होता. त्यानंतर काल अचानक पुणे शहर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात आले. या देशातील जनता चुकीच्या गोष्टी फार काळ खपवून घेत नाही, असे यावेळी सूचित करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी ‘धिक्कार असो, धिक्कार असो, नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, ‘मन की नही मणिपूर की बात करो’ आदी घोषणांनी जंतरमंतर परिसर दुमदुमून गेला होता. यात खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल, खासदार फौजिया खान, धीरज शर्मा, रवींद्र माळवदकर, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, जावेद इनामदार, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर आज, मंगळवारी सायंकाळी खासदार आणि पदाधिकारी असे सात जणांचे शिष्टमंडळ चार दिवसांच्या मणिपूर दौर्यावर रवाना होणार आहे. आहेत खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवा शाखेचे अध्यक्ष धीरज शर्मा, लक्षद्वीपचे खासदार फैजल, खासदार फौजिया खान, पुणे राष्ट्रवादी अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर आणि राष्ट्रवादीचे दिल्ली महासचिव योगेंद्र शास्त्री या सात जणांचा या शिष्टमंडळात समावेश आहे.