(मुंबई)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. यातच शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत म्हणाले होते की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्वीट करायचे. स्वत: च्या हाताने ट्वीट करता येते का? याचा अभ्यास करावा लागेल, असा टोला लगावत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी “स्वतः दहावी दोनदा नापास…” असं म्हणत विनायक राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “खासदार विनायक राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो” असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आता त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठे पाप झाले आहे. शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकले आहे असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते.