(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव येथील तंटामुक्त गाव समितीच्या महत्वपूर्ण सभेत प्रामुख्याने कोरोना संसर्गापासून बचाव होण्याच्या दृष्टीने शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन तंटामुक्त गाव समितीचे सचिव तसेच
खालगावचे पोलीस पाटील प्रकाश जाधव यांनी केले.
तंटामुक्त गाव समितीची विशेष सभा खालगाव ग्रामपंचायत येथे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उल्हास उर्फ नाना मुळ्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष व माजी सैनिक मधुकर रामगडे, खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर यांसह समितीचे व ग्रामपंचायतीचे निवडक प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार खालगाव येथील बुधवार आठवडा बाजार बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना समुहाने फिरण्यास प्रतिबंध करणे, याशिवाय परिसरात फिरताना मास्क अनिवार्य अशा आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण शासकीय सूचनांचा अंमल करण्याचे आवाहन उल्हास उर्फ नाना मुळ्ये, पोलीस पाटील प्रकाश जाधव, मधुकर रामगडे, सरपंच प्रकाश खोल्ये यांनी उपस्थितांना केले. गावात तंटे उद्भवू नयेत, उद्भवल्यास ते गावातच सामंजस्याने मिटवण्यावर आपला अधिक भर असेल असा निर्धार यावेळी तंटामुक्त समितीने व्यक्त केला.