(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील रहिवासी व प्रसिद्ध व्यावसायिक (कांदा- बटाटे विक्रेते) श्री. महेंद्र धर्माजी गवळी यांचे शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ४१ व्या वर्षी खालगाव जाकादेवी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. दिवंगत महेंद्र धर्माजी गवळी अत्यंत कष्टाळू आणि आपल्या व्यावसायात पारंगत असे व्यक्तिमत्व होते. सांगली जिल्ह्यातील अष्टा हे त्यांचे मूळ गाव होय. गेली २५ वर्ष ते व्यवसायानिमित्त खालगाव जाकादेवी येथे स्थायिक झाले होते. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी व्यावसायात लक्ष घातले. घाऊक कांदा बटाटा विक्रीच्या निमित्ताने ते संपूर्ण जाकादेवी खालगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले होते. जाकादेवी खालगाव परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक स्थानिक कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सभाग असे. अनेकांना मदतीसाठी त्यांचा हात नेहमीच पुढे असे.
त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल जाकादेवी- खालगाव पंचक्रोशीसह सांगली -अष्टयातून दुःख व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली ,एक मुलगा ,दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. कष्टाळू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.