(दापोली)
दापोलीत खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता दापोली पोलिसांना चौघांपैकी तिघांना शोधण्यास यश आले आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. हा प्रकार २ जुलै आणि ३ जुलै रोजी घडला.
विसापूर गावातील पाथरीकोंड येथील आपल्या राहत्या घरातून भरत भेलेकर (३४) हा दुपारी २:३० वाजण्याच्या सुमाराला बेपत्ता झाला. चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर यांच्यासोबत कुंबळे (ता. मंडणगड) या ठिकाणी लाकडीपट्टी आणण्याकरिता जात आहे, असे सांगून घरातून निघून गेला. तो परत आला नाही. आजूबाजूला शोध घेऊन ही आढळून आला नाही त्यामुळे नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली.
दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी त्याची पत्नी सुगंधा भेलेकर ही सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमाराला मुलांना शाळेत सोडायला जाते, असे सांगून आराध्य (७) व श्री (४) या आपल्या मुलांना मुगीज शाळा नंबर १ शाळेत घेऊन जाते सांगून घरातून निघून गेली मात्र, तीसुद्धा अद्याप परतलीच नाही अशी माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली. म्हणून मुलांच्या अपहरणाचा तर सुगंधा ही बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती.
एकाच कुटुंबातून चौघेजण बेपत्ता झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाने खळबळ माजली होती. दापोली पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकात याची माहिती दिली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे सुगंधा भेलेकर ही ठाणे परिसरात दोन मुलांसमवेत असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार पोलिसांनी या तिघांवर नजर ठेवून दुसऱ्या बाजूने सापळा रचला होता. हे तिघे जण सकाळी ठाणे दापोली या बसमध्ये बसल्याचे सूत्रांकडून समजले. ही गाडी पालगड या ठिकाणी आली असता हे तिघे जण गाडीतून उतरल्याचे पोलिसांना समजले. या गाडीच्या पाठोपाठ पोलीसांचे पथक होते. त्यांनी या तिघांना ताब्यात घेऊन दापोली पोलीस ठाण्यास आणले.
दरम्यान सुगंधा भेलेकर ही घरात होणारी भांडणे व वाद विवादामुळेच घरातून बाहेर पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दि. २ जून रोजी पती भरत भेलेकर हा काहीही न सांगता निघून गेल्यामुळे पत्नीने संपूर्ण रात्रभर जागून काढली होती. मनःस्थिती ठीक नसल्यामुळेच सकाळी मुलांना घेऊन शाळेत न जाता तिने मुंबई गाठल्याचे तिने सांगितले आहे. दरम्यान, भरत भेलेकर हा बेपत्ता असून त्याचा तपास दापोली पोलिसांमार्फत सुरू आहे. या प्रकरणात ४ बेपत्ता व्यक्तींपैकी तिघेजण ताब्यात घेण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.