(पुणे)
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा फोटो काढून तो अॅपवर डाउनलोड केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तत्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली जाणार आहे. बांधकाम विभागाने या संदर्भात अॅप विकसित केले असून, तीन दिवसांपासून ते महिनाभरात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या ‘एम-सेवा’ अॅॅपमध्ये नागरिकांना खड्डेविषयक तक्रार करण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने तयार केलेल्या ‘पीसीआरएस’ (पॉटहोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम) अॅपचे इंटीग्रेशन करण्यात आले आहे. लवकरच गुगल प्ले स्टोअरवरही ते उपलब्ध होणार आहे. त्यावर जनतेला अभिप्राय, सूचना, तक्रारी देता येतील.
त्याचीही कार्यवाहीची सूचना संबंधित अभियंत्याला जाईल व त्यानुसार रस्त्यावरील खड्डे भरणे यासह इतर कामे वेळेत करून पुन्हा संबंधित कामाचे छायाचित्र अपलोड करून संबंधित नागरिकांना संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बी. एन. बहीर, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पुणेचे अधीक्षक अभियंता एस. एम. चिखलीकर, कोल्हापूर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. आर. पाटील आदी उपस्थित होते.