कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गावागावात केलेला शिरकाव लक्षात घेउन बाधित गावकऱ्यांना आधार देण्यासाठी चिपळूण तालुक्यातील खडपोली ग्रामपंचायत,ग्रामकृतीदल युवक यांनी पुढाकार घेत सुसज्ज विलगीकरण केंद्र उभारुन जिल्ह्यातील ग्रा.पं. समोर आदर्श ठेवला आहे. सोमवार दि.१७ मे रोजी गटविकास अधिकारी श्री. राऊत जि.प.सदस्य विनोद झगडे तालुका आरोग्य अधिकारी सौ ज्योती यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत या विलागिकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
गावातील वाढती रुग्णसंख्या त्यात रोगाबद्दल असणाऱ्या जागरुकतेचा अभाव लक्षात घेऊन जि. प. शाळेमध्ये विलगिकरण व प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला व पंधरा बेडचे कोविड केअर सेंटर उभे राहिले. या ठिकाणी रुग्णांच्या राहण्याची तसेच डॉक्टरांमार्फत वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता व तिसऱ्या लाटेचे वर्तवण्यात आलेली शक्यता लक्षात घेता खडपोलीतील कोविड केअर सेंटर इतर गावांसाठी रोल मॉडेल ठरुन ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.
सरपंच सौ. नेहा खेराडे व सहकारी सदस्या, उपसरपंच मंगेश गोटल, महेश मोहिते, व सहकारी सदस्य ग्रामविकास अधिकारी रोहिदास हांगे, ग्रामकृतिदल आदी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने यासाठी विशेष योगदान देत आहेत.