(पुणे)
पुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने गुन्हेगारीवर आधारित वेब सिरीज पाहून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना शिक्रापूर येथे घडली आहे. जॅाय लोबो असं मृताचं नाव असून पत्नी सॅन्ड्रा लोबो व ॲग्नेल कसबे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पुणे ग्रामीम पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबोयांचा १७ वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी असून तिचे ॲग्नैल कसबे याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. जॉय लोबो यांचा या प्रेमप्रकरणाला विरोध होता. यामुळे त्यांचा मुलीशी व पत्नीशी नेहमी वाद होत होता. मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तसेच स्वतःच्या प्रेम संबंधातील अडथळादूर करण्यासाठी सॅन्ड्रा हिने मुलीचा प्रियकर कसबे याच्या मदतीने पतीला संपवले. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत दोघांना अटक केली आहे.
जॅाय लोबो यांनी काही दिवसापूर्वी पत्नी, मुलगी आणि तिचा प्रियकर या तिघांना मारहाण केली होती. त्यावरून जॅाय लोबो याचा तिघांनी मिळून घरात चाकूने खून केला आणि एक दिवस घरातच मृतदेह ठेऊन दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला.