(नवी दिल्ली)
मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह (पुनर्विचार) याचिकेबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. या सुनावणीचा तपशील समजू शकला नाही, तरी या याचिकेवर सुनावणी घेणार की याचिका फेटाळणार यावर सर्वोच्च न्यायालय लवकरच आपला निर्णय देणार आहे. मराठा आरक्षणाबाबत दोन क्युरेटिव्ह पिटीशन दाखल आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध ॲड जयश्री पाटील आणि मराठा आंदोलक विनोद पाटील विरुद्ध ॲड जयश्री पाटील अशा या दोन स्वतंत्र याचिका आहेत. बऱ्याचदा क्युरेटिव्ह पिटीशन याचिका सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फेटाळल्या जातात. त्यामुळे या क्युरेटिव्ह याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेल हा १०० टक्के विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षण टिकले त्या आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारे आरक्षण मिळेल, असा विश्वास याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला.