(रत्नागिरी /जिल्हा प्रतिनिधी)
शिक्षणाला वयाच बंधन नसतं अस म्हणतात ते खरच आहे. जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतही यश सहज साध्य होत. शिक्षणाच्या बाबतीतही तसच आहे. 60-70 वर्षाच्या वृद्धानीही बोर्डाची परीक्षा दिल्याच्या घटना पाहिल्या आहेत. त्याशिवाय सूनबाई सासरे व दीर एकाच वर्षी बारावी परीक्षा पास झाल्याचेही पाहिले आहे. अशीच एक घटना रत्नागिरीमध्येही समोर आली आहे, ती हातखंबा येथे.
याच असं झालं एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलाने बारावीची परीक्षा देऊन उत्तीर्णही झाले आहेत. एवढच नव्हे तर मुलापेक्षा आईने जास्त गुण मिळवल्याने 45 व्या वर्षीही आम्ही त्याच उमेदीने शिक्षण घेऊ शकतो हे पटवून दिलं आहे. हातखंबा बौद्धवाडी येथे राहणाऱ्या कांबळे कुटुंबातील तिघांनी बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या या शिक्षणाच्या उमेदीने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. ही घटना सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यानंतर बारावी पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकजणांनी काबाड कष्ट करत, मोलमजुरी करत बारावीची परीक्षा पास केली आहे. राजन कांबळे (४५) व रोहित कांबळे (१९) अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. तर रोहिणी कांबळे (४२) असे आईचे नाव आहे. राजन कांबळे यांनी वयाच्या ४५ व्या वर्षी परीक्षा दिली. तर त्यांच्या मुलासह आईने देखील वडीलाबरोबरच बारावीचा गड सर केला आहे.
सासऱ्यांची शिक्षणाची इच्छा सूनेने पूर्ण केली
या यशानंतर राजन कांबळे म्हणाले की, लग्नापूर्वी पत्नीचा बारावीमध्ये एक विषय राहून गेला होता. त्यावेळी सासऱ्यांनी सुनेने बारावीची पुन्हा परीक्षा देऊन यश मिळवावे. हीच वडिलांची इच्छा मनी बाळगून तिने मला ही बारावी परीक्षा देण्यासाठी आग्रह केला. यातून आम्ही दोघे ही बारावी उत्तीर्ण झालो. या यशामागे आईची साथ दडलेली आहे. तसेच ऑनलाईन ऑफलाईन अभ्यासासाठी आम्हा दोघांना बारावीत असणाऱ्या मुलाने ही उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. आज आम्ही दोघेही बारावी उत्तीर्ण झालो. माझ्या वडिलांची इच्छा पत्नीने पूर्ण केली आहे. याचा खूप आनंद वाटतोय.
या तिघांनी मार्च २०२२ मध्ये बारावीची परीक्षा दिली होती. रोहित राजन कांबळे याला विज्ञान शाखेतून ५२ टक्के गुण मिळाले असून त्याचे वडील राजन कांबळे यांना कला शाखेतून ५४ टक्के गुण मिळाले आहेत तर आई रुचिता यांना कला शाखेतून ५६ टक्के गुण मिळाले आहेत. मुलगा व पती पेक्षा जास्त गुण मिळवल्यामुळे घरोघरी महिलांचाच झेंडा असल्याचे बोलले जात आहे.
घर व कुटुंब सांभाळून प्रदीर्घ कालावधी नंतर सुखी संसाराच्या जीवनातून या आई वडिलांनी अभ्यासाचे योग्य पद्धतीने नियोजन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.