(पनवेल)
आपली कोळी बांधवांची संघटना समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता काम करीत असून आपला विचार सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचविला पाहिजे. समाजातील युवकांनी या कार्यात पुढे येऊन आपले मूलभूत हक्क व अधिकार मिळवण्याकरिता आपली ताकद दाखविणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन युवा अध्यक्ष अँड. चेतन पाटील यांनी केले.
कोळी महासंघाच्या महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक लोणावळा येथे पार पडली. या बैठकीस महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळत नसल्यानेआपला समाज आजही मागासलेला असल्यामुळे राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याकरिता सर्वांनी एकजुटीने संघटना मजबूत करण्याचे आवाहन अँड. चेतन पाटील यांनी केले.
कोळी महासंघ ही संघटना गेल्या दहा-बारा वर्षापासून महाराष्ट्रातील आदिवासी कोळी तसेच कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कोळी महासंघाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा सर्वसामान्य समाज बांधवांना लाभ मिळण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कोळी महासंघाच्या प्रत्येक गावात शाखा सुरू करू करणे, नवीन नियुक्त्या करताना काम करणाऱ्या व्यक्तीचा विचार होणे, सभासद नोंदणी करणे, समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे ते सोडविण्याकरिता मोर्चा, आंदोलने करणे तसेच विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर विविध निवडणुकांमध्ये कोळी महासंघाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशा विविध मागण्या यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्या असून काही ठराव देखील यावेळी सर्वानुमते मंजूर करून घेण्यात आले.
आपला समाज विविध भागात विखुरलेला आहे. समाज बांधव एकजूट करून आपली ध्येय धोरण त्यांच्यापर्यंत पोहोचवावी तसेच समाजाचे प्रश्न सोडवून आपली उन्नती व उत्कर्ष करण्याकरिता सर्वांनी प्रामाणिक काम करावे असे उपनेते देवानंद भोईर यांनी सांगितले.
नारायण मुकादम, बाळासाहेब सैदाणे,अरुणभाऊ कोळी, सुरेश पाटकर, चंद्रकांत घोडके, सतीश धडे, राजेंद्र हजारे, मुकेश भाऊ सोनवणे, अरुण लोणारी, सुभाष कोळी, सुनील बळवंते, सुधाकर सूर्यवाड, गुलाबराव गांगुर्डे , सौ.माधुरीताई, अभय पाटील, विकास सूर्यवंशी व इतर प्रमुख पदाधिकारी ह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.