(चिपळूण /वार्ताहर)
तालुक्यातील कोळकेवाडी तांबडवाडी येथील पाखडीवर अतिवृष्टीमुळे डोंगरवरील वाहत येवून जमा झालेले माती आणि पाखडीची झालेली दुरवस्था यामुळे नागरिकांना पाखाडी वरून चालणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर दीपक रतनराव शिंदे यांच्या घराच्या समोरील असणारा नाला गेली तीन वर्षांपासून कोसळला आहे. यामुळे दीपक रतनराव शिंदेसह तेथील चारही कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे गेली तीन वर्षे अर्ज करूनही काम झालेले नाही. शेवटी आ. शेखर निकम यांच्याकडे दीपक रतनराव शिंदे यांनी नाला दुरुस्ती करणे आणि पाखडी दुरुस्ती व्हावी यासाठी निवेदन दिले आहे.
कोळकेवाडी तांबडवाडी येथील दीपक रतनराव शिंदे यांनी स्वतःच्या मालकीची जागा विनामोबदला पाखाडीसाठी दिली. आणि लोकांना सुविधा व्हावी. यासाठी त्यांनी प्रयत्न केले. याच पाखाडी वरती डोंगरावरून अतिवृष्टीमुळे आलेली सर्व माती आणि गाळ दगड गोटे पसरले आहे. असे अनेकवेळा झाल्यामुळे गेली तीन वर्षे सरपंच व ग्रामसेवक, ग्रामपंचायत कोळकेवाडी यांना निवेदन देत तात्पुरत्या स्वरूपात तरी नाला टाकुन मार्गदर्शक काढावा, अशी विनंती करण्यात आली. परंतु आजपर्यंत काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळेआयुक्त, कोकण भवन यांना पत्रव्यवहार केले गेले आहेत. त्यातून मा.आयुक्त यांनी मा. जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना पत्रव्यवहार करून अधिनस्त कार्यालयाला कार्यवाही करण्याचे आदेश केले. व कार्यालयास अहवाल पाठविण्यास सांगितले होते. तरीही याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या पाखाडीवरून चालणे ग्रामस्थांना आता मुश्किल होत आहे. नागरिकांना यातून चालताना सुद्धा त्रास होत आहे. अतिशय वेदनादायी घटना म्हणजे वाडीतील लोकांना खुर्चीत बसवून नागरिकांना दवाखान्यात नेण्यात येत आहे.त्याचबरोबर गेली अनेक वर्ष हा जुना मोरी सहित नाला दीपक रतनराव शिंदे यांच्या घराच्या मागील बाजूस असलेला नाला सुद्धा बांधण्यात आला होता. मात्र तो सद्यस्थितीत कोसळल्याने या नाल्यामुळे दीपक रतनराव शिंदे, सुवर्णा गंगाराम शिंदे, शिवाजी रामजी शिंदे, आणि विजय रामजी शिंदे यांच्या कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे.
याबाबत 15 नोव्हेंबर 2022 रोजी कोळकेवाडी ग्रामपंचायतीला या संदर्भात पत्र दिले होते. मात्र अद्याप त्याच्यावरती कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. गेले तीन वर्ष नाल्याची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे शेवटी आता दीपक शिंदे, कोळकेवाडी यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे मा.आमदार शेखर निकम यांच्याकडे पाखाडी संदर्भात आणि नाल्या संदर्भात निवेदन दिलेले आहे. या निवेदनाची आता आ.निकम कशी दखल घेतात आणि नाल्याची समस्या मार्गी लावतात याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.