सोलापूर विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर नंतर आता मुंबई विद्यापीठाच्या आजपासून (३ फेब्रुवारी) सुरु होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी आजपासून संपावर गेले असून त्यांनी परीक्षेच्या कामकाजावरही बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाने आजपासून सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचं लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. मुंबई विद्यापीठाने परीक्षा स्थगित केल्याचं परिपत्रक काढत माहिती दिली आहे.
अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारल्याने मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या स्थगित केलेल्या सर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपावर परीक्षांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या संपामुळे विद्यापीठाच्या परीक्षांवर परिणाम झाला आहे.