(मुंबई)
कोल्हापूरच्या मराठमोळ्या ऐश्वर्या जाधवने विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील कनिष्ठ गटात (अंडर १४) प्रवेश मिळवत पदार्पणालाच चमकदार खेळ केला. तिने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या रोमानियाच्या अँड्रिया सूरला दिलेली झुंज स्तुत्य अशीच होती. या लढतीत ऐश्वर्याला विजय मिळवता आला नसला तरी तिने अप्रतिम सर्व्हिससह वेगवान फटके मारत प्रतिस्पर्धी टेनिसपटूंकडूनही दाद मिळवली. महाराष्ट्राच्या या गुणी कन्येच्या जागतिक यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून कोल्हापूरकर ऐश्वर्या जाधवने टेनिसमध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चमकदार खेळ करीत राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळे विम्बल्डन ज्युनियर गटात (१४ वर्षाखालील मुली) तिची हिंदुस्थानकडून निवड झाली होती. दोन महिन्यांपूर्वी अखिल हिंदुस्थानी टेनिस संघटनेने ‘आयटीएफ वर्ल्ड अंडर १४’ मुलींच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐश्वर्याने चार लढती जिंकत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे तिची विम्बल्डन ज्युनियर गटासाठी यंदा निवड झाली होती.