(कोल्हापूर)
सध्या रत्नागिरीवासियांना जवळ असणारी कोल्हापूरची विमानसेवा लवकरच कात टाकणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम सध्या चालू असून येत्या वर्षअखेरपर्यंत ते पूर्ण होणार आहे. यानंतर या विमानसेवेला अधिक गती येणार आहे. कोल्हापूर राज्यातील प्रमुख शहरांसह देशातील प्रमुख ठीकाणांशी हवाई मार्गाने जोडले जाणार आहे.
‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर मुंबई, हैदराबाद, तिरुपती, बंगळूर या शहरांशी जोडले गेले आहे. प्रवाशांची मागणी असल्याने कोल्हापूर-अहमदाबाद अशीही विमानसेवा सुरू झाली आहे. तर महाराष्ट्रासह तेलगंणा, कर्नाटक, गुजरात अशा तीन राज्यांच्या राजधानीशी कोल्हापूर जोडले गेले आहे. तीन राज्यांच्या राजधानीला हवाईमार्गाने जोडले गेलेले मुंबई, पुणे, नागपूरनंतर कोल्हापूर शहर ठरले आहे. विमानतळावर सुरू असलेली विस्तारीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर विमानसेवाही विस्तारली जाणार आहे.
सध्या अपुर्या धावपट्टीमुळे काही विमान कंपन्यांना मर्यादा येत आहेत. वाढीव धावपट्टीचा वापर सुरू होणार असल्याने या कंपन्यांनीही विमानसेवेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या दोनच विमानांचे पार्किंग करण्याची सुविधा विमानतळावर आहे. नवा अॅप्रनचा वापर सुरू झाल्यानंतर तीन एटीआर, एक एअरबस यासह एकूण पाच विमाने एकाच वेळी पार्क करता येणार आहेत. त्यातच नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर पुणे-मुंबईतील विमाने पार्किंगसाठी कोल्हापुरात येतील, त्यामुळे कोल्हापुरातील दैनंदिन विमानांची संख्या तर वाढेलच; पण कोल्हापूर अनेक शहरांशी जोडले जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळाला कार्गोची परवानगी मिळाली आहे. यामुळे विमानतळावरील मालवाहतूकही नजीकच्या कालावधीत वाढणार आहे.