(नवी दिल्ली)
ज्यांनी आपले आयुष्य लोकांची सेवा करण्यात आणि लोकांना न्याय मिळवून देण्यात घालवलं असे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी काल मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी कोर्टाला निरोप दिला. यावेळी ते भावूक झाले होते. सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन करत निरोप दिला. जवळपास 37 वर्षे काम केल्यानंतर सरन्यायाधीश उदय लळीत यांनी काल निरोप घेतला. त्यांनी 29 वर्षे वकिली केली तर शेवटची आठ वर्षे न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टात काम केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी कामकाजाचा शेवटचा दिवस मंगळवार भावूक ठरला.
तळकोकणात देवगडमधील गिर्ये गावातील उदय लळीत यांची 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. सरन्यायाधीश उदय लळीत यांना सरन्यायाधीश म्हणून तीन महिन्यापेक्षा कमी कालावधी मिळाला.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड 9 नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल. मे 2016 मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत. सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूड यांच्या नावावर आहे. 1978 ते 1985 या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. ते सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली आहे. 1998 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश म्हणून काम पाहिलं आहे.