कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा फटका कोकणी मेव्यांच्या उत्पादनांसह उलाढालीवर होणार आहे. दरवर्षी अनेक छोट्या उत्पादकांना कोकणी मेव्याचा मोठा आधार असतो; परंतु पर्यटनासह मुंबई-पुण्यातील वाहतूकीवर निर्बंध असल्याने वस्तूंच्या विक्रीवर रिणाम झालेला आहे. हीच परिस्थिती पुढील वर्षभर राहीली तर उत्पादन करुन काय फायदा असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोकणी मेव्यावरील प्रक्रिया उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदीचे निकष कडक केले आहेत. त्याचा अनेक छोट्या प्रक्रिया उद्योगांना बसत आहे. आंबा व्यावसायातून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. गतवर्षीपासून कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनातील निर्बंधामुळे वाहतुकीचा प्रश्न आवासून उभा आहे. यंदाही तिच परिस्थिती आहे. खाजगी वाहतूक तुरळक असली तरी ग्राहकांना थेट आंबा मिळत पाठवण्यात अडचणी येत आहेत.
त्याचबरोबर फणसाचे तळलेले गरे, आंबापोळी, कोकम सरबत या विविध कोकणातील उत्पादनांना मोठ्या शहरांतून मागणी असते. दरवर्षी पुण्या-मुंबईतून कोकणी मेवा घेण्यासाठी लोक रत्नागिरीत येतात. यंदा संचारबंदीमुळे वाहतूक बंद असल्याने चाकरमानी येऊ शकलेले नाहीत. शहरवासीय कोकणी मेव्याचा आस्वाद घेण्यासाठी धडपडत आहेत. कुरीअरची घरपोच सेवा देखील बंद आहे. काही ठिकाणी खाजगी वाहतूक सुरू आहे, परंतु त्यांचे दर अधिक आहेत.
ग्राहकांना घरपोच सेवा देताना कसरत करावी लागत आहे. मोठ्या शहरातील सोसायटीतही बाहेरील व्यक्तींना घेतले जात नाही. कोरोतील परिस्थिती भविष्यात गंभीर राहिली तर उत्पादन विक्रीचा प्रश्न आहे. त्यामुळे उत्पादन घटू शकते. तसे झाल्यास कोकणी मेव्यांवर अवलंबून असलेल्या उद्योगांवर परिणाम होईल.