कोरोना विषाणूशी लढण्यासाठी महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त प्रतिपिंडे अर्थात् अँटिबॉडीज असतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. सध्याची कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट लक्षात घेता, ही बातमी स्त्रियांच्या दृष्टीने सकारात्मक आणि दिलासादायक देखील आहे.
मुंबईतील सिव्हिल बॉडी संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्यात महिलांमध्ये कोरोनाविषाणूशी लढण्यासाठी जास्त प्रतिपिंडे असल्याचे समोर आले आहे. पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये प्रतिपिंडे जास्त असतात, असेही या सर्वेक्षणात आढळून आले आहे. झोपडपट्टी नसलेल्या भागात सेरो पॉझिटिव्हिटी वाढत होती, तर झोपडपट्टी भागात ती कमी होत आहे, असेही यात दिसून आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान कोरोना बाधितांची संख्या इतकी नव्हती, जितकी ती दुसर्या लाटेत पाहायला मिळाली, असेही यात म्हटले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये सेरो-पॉझिटिव्हिटी 37.12 टक्के आहे, तर पुरुषांमध्ये ती 35.02 टक्के आहे. झोपडपट्टी भागातील नगरपालिका दवाखान्यांमधून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये 41.61 टक्के सेरो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. एकंदरीत मुंबईत सर्व 24 प्रभागातील नागरिकांकडून घेण्यात आलेल्या 10 हजार 197 रक्ताच्या नमुन्यांमध्ये 36.30 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली आहे.
कस्तुरबा रुग्णालय परिसरातील मुंबई महापालिकेच्या मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळेत प्रतिपिंडांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती एका अधिकार्याने दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये तीन प्रभागातील झोपडपट्टी भागात 57 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली होती. तर ऑगस्टमध्ये झोपडपट्टी भागात 45 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली आहे. या सर्वेक्षणात यावर्षी मार्चमध्ये ‘अनलिंक्ड अॅनोनिमस सॅम्पलिंग’ पद्धत वापरली गेली. यामध्ये त्या लोकांचे नमुने घेतले गेले ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टनंतर मार्चमध्ये घेण्यात आलेले हे तिसरे सर्वेक्षण आहे.