(नवी दिल्ली)
कोरोनातून सुटका झाल्यानंतर आता देशात निपाह व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 6 रुग्ण आढळले आहेत. आता याबाबत केंद्र सरकारने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्या निपाह संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतरांना त्याची लागण झाली. निपाह संक्रमित रुग्णांमध्ये मृत्यूदर जास्त आहे, त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. निपाह हा कोरोनापेक्षाही महाभयंकर आहे, त्यामुळे होणारे मृत्यूदर हे कोरोनाच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने निपाह व्हायरसबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
निपाह व्हायरसने संक्रमित लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण कोविड-19 साथीच्या आजारापेक्षा खूप जास्त आहे. कोविडचा मृत्यू दर दोन ते तीन टक्के असताना, निपाहमध्ये संसर्ग झालेल्या लोकांचा मृत्यू दर 40 ते 70 टक्के आहे, असं आयसीएमआरचे महासंचालक राजीव बहल यांनी सांगितलं.
ICMR चे महासंचालक राजीव बहल म्हणाले, “2018 मध्ये आम्हाला आढळलं की केरळमधील उद्रेक वटवाघळांशी संबंधित होता. वटवाघळांपासून मानवांमध्ये संसर्ग कसा पसरला हे माहिती नाही. पण हे नेहमी पावसाळ्यात घडतं. केरळमध्ये विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत यावर त्यांनी भर दिला.ते म्हणाले की, भारताबाहेर निपाह व्हायरसची लागण झालेल्या 14 रुग्णांना मोनोक्लोनल अँटीबॉडीज देण्यात आल्या आहेत आणि ते सर्वजण वाचले आहेत. औषधाची सुरक्षितता तपासण्यासाठी फक्त फेज-1 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. परिणामकारकता तपासली गेली नाही. ज्या रुग्णांसाठी अधिकृत समाधानकारक उपचार पद्धती नाही त्यांनाच ते दिले जाऊ शकते.
2018 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस मिळाले. सध्या फक्त 10 रुग्णांसाठी डोस उपलब्ध आहेत. भारत निपाह विषाणू संसर्गाच्या उपचारांसाठी ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी 20 डोस खरेदी करेल. हे औषध आत्तापर्यंत भारतात कोणालाही दिलेले नाही. संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात औषध देण्याची गरज आहे.
एका निवेदनात म्हटले आहे की, त्या व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. पीटीआय वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, कोझिकोडमध्ये निपाह संक्रमित रुग्णांची एकूण संख्या सहा झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, राज्य सरकारने संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि ज्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे,अशा सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
केरळमध्ये 2018 साली पहिल्यांदा निपाह व्हायरसचा संसर्ग लागण झाला होता. त्यावेळी 18 जणांना निपाहचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2019 आणि 2021 मध्येही हा व्हायरस पसरला होता.