कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवला असतानाच आता नव्या एका आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे काही रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. पण हा आजार नेमका आहे तरी काय समजून घेऊयात-
कोविडच्या उपचारामध्ये अनेक रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारामध्ये सर्व लक्ष हे फुफ्फुसांची क्षमता वाढवणे, त्या भागातील संसर्ग कमी करण्यावर दिले जात आहे. त्यामुळे स्टिरॉइडचा वापर आणि इतर रक्तातील वाढत्या साखरेची नोंद रुग्णांकडून वेळोवेळी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर अनेकांना रक्तातील साखर वाढल्याचं जाणवत आहे.
कोरोना काळात काही रुग्णांमध्ये दीर्घकाळ ऑक्सिजनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे सायनसचा भाग कोरडा होतो. त्यानंतर म्युकरमायकोसिस हा आजार होण्याचा धोका वाढतो. हा संसर्ग नाकातून पुढे पसरतो तो काहीजणांमध्ये तो मेंदूपर्यंत जाऊन संसर्गित करतो. पण या आजाराचे निदान योग्यवेळी झाले तर तो प्राणघातक ठरत नाही.
या आजाराची सुरुवात नाकातील संसर्गापासून होते. त्यानंतर डोळ्यावर परिणाम होतो. टाळूच्या वरच्या भागाला बुरशी येते, त्या रुग्णांमध्ये टाळूचा हा भाग काढावा लागतो. परिणामी उपचार न घेतल्यास रूग्णाला आपला डोळा देखील गमवावा लागू शकतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांमध्ये हा रोग लवकर पसरतो आणि लवकर परिणाम करतो. कोरोना होऊन गेला असला तरी मधुमेह असलेल्या रूग्णांनी रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायला हवी.