कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात माजवलेला हाहाकार बघता लोक घाबरलेले आहेत. रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या व मृतांचा आकडा देखील नियंत्रणात आणण्यात यंत्रणेला अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट निश्चित असल्याचं विधान केल्यामुळे चिंता अधिकच वाढली होती. या पार्श्वभूमीवर राघवन यांनी कोरोनाची तिसरी लाट आपण कशी रोखू शकतो, याविषयी मार्गदर्शन करणारी भूमिका मांडली आहे. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत के. विजय राघवन यांनी ही भूमिका मांडली आहे.
के. राघवन म्हणाले, जर आपण कठोर पावले उचलली, तर तिसरी लाट कदाचित कुठेच येणार नाही. आपण स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि शहर पातळीवर कोरोनाबाबतचे नियम तथा मार्गदर्शक सूचना किती प्रभावीपणे अंमलात आणतो, यावर हे अवलंबून असेल, त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावलं उचलन्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर नियमांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, हे सांगता येणं कठीण आहे. आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं, असही ते पुढे म्हणाले.
तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर या मुद्द्यावरून न्यायालयानं केंद्र सरकारची आणि दिल्ली सरकारची कानउघाडणी केली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिल्ली सरकार आणि केंद्राची कानउघाडणी केली. प्राणवायूअभावी दिल्लीत अनेकांना प्राण गमावावे लागत आहेत. त्यामुळे प्राणवायू वितरण आणि पुरवठ्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप न करता सहकार्याने काम करावे.
करोनाची तिसरी लाट येणार असून, ती मुलांसाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आमच्या वाचनात आले आहे. आताच पूर्वतयारी केली तर या करोना लाटेस सामोरे जाता येईल. त्यासाठी प्राणवायूचा संरक्षित साठा असला पाहिजे. केवळ प्राणवायू वाटप करून जमणार नाही, तर त्याचा रुग्णालयांना अखंडित पुरवठा करण्याची व्यवस्था करायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
Post Views: 65