(खेड / भरतं निकम)
कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी चिपळूण कोळकेवाडीतील ग्रामस्थांच्या जमिनी सन १९७४ मध्ये संपादित करण्यात आल्या. या संपूर्ण वाडीचे खेड तालुक्यातील चाकाळे येथे पुनर्वसन करण्यात आले. प्रकल्पग्रस्तांना घरे बांधण्यासाठी जागा दिल्या गेल्या. मात्र पर्यायी शेतजमीन केवळ कागदावरच देण्यात आल्या, असा आरोप प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे.
सन १९७४ पासून आजतागायत प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या पर्यायी शेतजमिनीचे प्रत्यक्षात सीमांकनच करून देण्यात आले नसल्याने ते तात्काळ भूमी अभिलेख विभागामार्फ़त सरकारने करून द्यावे व त्या बाबतचा आवश्यक माहिती अहवाल पुरविण्यात यावा असे प्रकल्प ग्रास्थांच्यावतीने चाकाळे येथील दीपक भिकाजी मोहिते यांनी दिनांक २० जुलै २०२३ रोजी येथील तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
खेड तालुक्यातील चाकाळे येथील कोयना प्रकल्पग्रस्तांना फक्त घराच्या प्लॉटच्या जमिनी ताब्यात देण्यात आल्या. मात्र पर्यायी शेतजमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. या वाटप केलेल्या जमिनीचे सद्यस्थितीत जमीन हस्तांतरित झालेली नाही. शासन निर्णयानुसार अप्पर जिल्हाधिकारी व पुनर्वसन उपजिल्हाधिकारी रत्नागिरी या कार्यालयाकडे पुनर्वसनाचा विषय सन १९७४ पासून आजतागायत तसाच पडून आहे.
या प्रकल्पग्रंस्थानी जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कोकण भुवन नवी मुंबई, व शासना सोबत वारंवार बैठका घेऊन व विनंती अर्ज करून सन १९७४ पासून पाठपुरावा केला आहे. त्यानुसार पूर्वसन उपजिल्हाधिकारी यांनी १६/१०/२०१८ च्या पत्रानुसार जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांना आदेश देण्यात आले होते. त्याची प्रत उपअधीक्षक भूमिअभिलेख खेड यांना देण्यात आली होती.
त्यानुसार उपअधीक्षक भूमिअभिलेख खेड यांच्या कार्यालयाकडून दिनांक ४ डिसेंबर २०१८, १४ डिसेंबर २०१८ दिनांक २ जानेवारी २०१९ रोजी सर्व्हे करण्यासाठी चाकाळे येथे आले होते. संपूर्ण शेतजमिनीच्या गाव नकाशानुसार सर्व्हे नंबर हिस्सा नंबर पाहिले असता संपूर्ण शेत जमिनी या डोंगराळ भागात असून त्या चढउताराच्या आहेत. तेथे झाडी झुडपे व काटेरी रान साफसफाई केल्याशिवाय येथे मोजणी करणे शक्य नाही. देण्यात आलेल्या अथवा दर्शविण्यात आलेल्या शेत जमिनीचे सीमांकन झाले नसल्याने या शेतजमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना हसत्तांतरीत झालेल्या नाहीत. याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख खेड यांचा अहवाल पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांना प्राप्त झाला आहे. पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार तालुका कृषी अधिकारी खेड यांना आदेश प्राप्त झाल्यावर चाकाळे येथील प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या शेतजमिनी लागवडीस योग्य आहेत अगर कसे याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार कृषी अधिकारी खेड यांनी चाकाळे येथील प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमिनीत पीक लागवड होऊ शकत नाही असे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी याना कळविले आहे. त्यानुसार तलाठी सजा मुरडे यांना प्रकल्पग्रस्तांना माहिती तात्काळ पुरविण्याबाबत कळवले आहे.