(रत्नागिरी)
कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने येत्या सप्टेंबरमध्ये रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कोमसापच्या रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी आणि जिल्हा साहित्य संमेलनाची करण्यात आलेली घोषणा यामुळे जिल्ह्यातील साहित्य चळवळीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी जिल्हा मंडळाची कार्यकारिणी सभा नुकतीच जिल्हा अध्यक्ष प्रा. आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोमसापचे विश्वस्त प्रमुख श्री. रमेश कीर, विश्वस्त श्री. अरुण नेरुरकर, केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर, गजानन तथा आबा पाटील, कार्यवाह माधव अंकलगे, कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी झालेल्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला जिल्ह्यातील शाखांचे अध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता कीर म्हणाल्या की, नव्या कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात कोमसापचे कार्य कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. वर्षभरात विविध कार्यक्रमाचे नियोजन करून जिल्ह्यातील साहित्यिकांना कोमसापच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करण्याची गरज आहे. तसेच यावेळी कोमसापचे रत्नागिरी जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष आनंद शेलार यांनी जिल्ह्यात कोमसापचे संघटन मजबूत करण्याचे काम यापुढील काळात करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक तालुक्यातील शाखा अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगून शाखांच्या माध्यमातून अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.
कोमसापच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले. दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्य चळवळीला चालना मिळणार आहे. यावेळी उपस्थित असणारे विश्वस्त प्रमुख श्री. रमेश कीर आणि श्री. अरुण नेरुरकर यांनीही मार्गदर्शन करताना कोमसापने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात साहित्य चळवळ प्रवाहित ठेवण्यासाठी आतापर्यंत कार्य केले असून भविष्यात कोमसापच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक बाबीकडे दुर्लक्ष करून सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन कार्य करताना युवा पिढीला प्राधान्य दिले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
कोमसापचे नूतन रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आनंद शेलार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीत पुढील पदाधिकारी निश्चित करण्यात आले आहे. यात उपाध्यक्ष – श्री. गोविंद राठोड, वासुदेव तुळसणकर, सचिव- राजेश गोसावी, सहसचिव- विनोद मिरगुले, खजिनदार- शाहिद खेरडकर, केंद्रीय प्रतिनिधी- बाळासाहेब लबडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हा कार्यकारिणीच्या सभेला जिल्हाध्यक्ष आनंद शेलार यांच्यासह लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, लांजा शाखेचे जिल्हा प्रतिनिधी राजेश गोसावी, गुहागर शाखेचे अध्यक्ष शाहिद खेरडकर, गुहागर शाखेचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. बाळासाहेब लबडे, राजापूर शाखेचे जिल्हा प्रतिनिधी विनोद मिरगुले, खेड शाखेचे जिल्हा प्रतिनिधी गोविंद राठोड, मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, मालगुंड शाखेचे जिल्हा प्रतिनिधी गजानन पाटील, रत्नागिरी शाखेचे सचिव सुनील चव्हाण, खेड शाखेचे जलील राजपूरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राजापूर शाखा अध्यक्ष वासुदेव तुळसनकर आणि रत्नागिरी शाखा अध्यक्षा तेजा मुळ्ये हे वैयक्तिक कारणामुळे सभेस उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांनी सभेत होणाऱ्या निर्णयांना पाठिंबा असल्याचे लेखी पत्राद्वारे कळविले होते. त्यानंतर केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी सर्वांचे आभार मानले.